दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कामगाराचा दुचाकीवरून घरी जात असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस हद्दीतील ढमाले वस्तीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला.
या घटनेत या कामगारांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. ही माहिती पाटस पोलीसांनी दिली. समीर सुदाम नाथू ( वय 31, रा. नाथाचीवाडी ता.दौंड जि.पुणे ) असे या कामगाराचे नाव आहे.
रविवारी ( दि.1) रात्री हा अपघात झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समीर नातू हे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करून दुचाकीवरून ( क्रमांक एम. एच. 12 , ए. एम. 9555 ) घरी जात होते.
पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस हद्दीतील पुणे बाजूकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात समीर यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस पोलीस फौजदार रामभाऊ घाडगे, सहाय्यक फौजदार सागर चव्हाण, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण, पोलीस शिपाई समीर भालेराव, संजय आवाळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.











