संपादकीय
तब्बल बारा वर्षे उलटली… एक तप उलटले.. कदाचित अनेकांना आठवत नसेल.. पण सन २००९ च्या काळात अख्खा नीरा नदीकाठ आणि त्यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक अल्पवयीन पोरीच्या बापाला अस्वस्थ करून टाकलं होतं या पोरीच्या खुनानं..!.
आणि सन २०१३ मध्ये तिच्या खूनाच्या निकालानं पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र आणि राज्यातल्या तरुण पोरींच्या आईबापांना अस्वस्थ करून टाकलं…! असं काय घडलं होतं तिथं?…आणि आता हे आठवायचे काय कारण?…
बारामतीत येत्या ३ ऑगस्ट रोजी पूजा जाधव स्मृती प्रबोधन ‘सक्षमा’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, त्या अनुषंगाने जिच्या नावाने हा पुरस्कार दिला जाणार आहे, ती सध्या काय करते? याचा आढावा घ्यायलाच हवा, नाही का?
म्हणून आम्ही त्या तावशीच्या रस्त्याने जरा एकांती असताना निघालो.. काही अंतरावर गेल्यावर तिने हाक मारली..! आम्ही दचकलो.. मागे वळून पाहिलं तर बॉबकट केलेली ती.. होय तीच..पाठमोरी आम्हाला दिसली.. आम्ही घाबरून काही बोलण्यापूर्वीच आणि तोंडातून शब्द येण्यापूर्वीच तिने अगदी विक्रम वेताळासारखी कथा सांगायला सुरवात केली..
‘भाऊ, जे घडलं ते साऱ्यांनी अनुभवलं… मी जे अनुभवलं ते कुणालाच नाही कळलं… एका आठवीतील निरागस मुलीचा खून होतो, त्यापाठोपाठ दुहेरी खून होतो… माझं काय जाण्याचं वय होतं का हो? कोरोनाचा काळ असता आणि काय झालं असतं, तर तेही एक वेळ ठिक होतं हो.. पण इथंतर… जाऊ द्या.. एक तप उलटलं… ती आठवण सुन्न करते…
पण म्हणतात ना, की, देवाच्या काठीला आवाज नसतो.. पण ती जेव्हा लागते, तेव्हा त्याच्यानंतरच्या काही काळानंतर त्याचे दृश्य परिणाम दिसू लागतात.. न्यायाच्या मंदिरात पुरावे, साक्षींच्या झुंडीच्या झुंडी नाकाम ठरल्या.. आज त्यातील कुणीच कुठेच दिसत नाही..नियती साऱ्यांचे माप पदरात टाकते…नक्की टाकते.. माझ्यासारख्या निष्पाप मुलीच्या खूनात जे जे कोणी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी होते, मदत करीत होते, त्या प्रत्येकाच्या बाबतीत जणू नियतीने न्याय केला.. फक्त प्रत्यक्षात शेवटपर्यंत हत्या कुणी केली हे समजलेच नाही..आजही नाही..!
जर माझी हत्याच खरोखर झाली असती, तर आतापर्यंत खुन्यांना शिक्षाही झाली असती.. मात्र बहुधा न्यायाच्या चरखात फक्त मी स्वतःच स्वतःची हत्या केली हा युक्तीवाद ऐकू आला नाही हेच नशिब! हे नशिब माझंही, अन् न्यायव्यवस्थेवर आजही ज्यांचा विश्वास टिकून आहे, त्यांचंही…!
या खून प्रकरणानंतर रस्त्यावर लोक आले. दगडफेकीच्या घटना घडल्या.. बरेच दिवस तपास सुरू राहीला.. अनेकांच्या राजकीय शक्ती पणाला लागल्या… संशयित सापडले, मात्र न्यायालयाच्या मंदिरात त्यांच्यावरचे आरोप टिकले नाहीत.
तब्बल २२ साक्षीदारातील १५ साक्षीदार फितूर झाले…दूरचे सोडा, जवळच्यांचाही आधार उरला नाही.. तपास करणारा अधिकारीही नोकरी सोडून पुढे राजकारणात रममाण झाला. O Yes.. म्हणता म्हणता.. न्यायाधिशाच्या विरोधातही बऱ्याच तक्रारी झाल्या, पुढे काय घडले फक्त त्याच्याशी संबंधित वकीलच जाणतात… ना सरकारी वकील राहीले, ना पोलिस!
राजकारणातील पाठीराख्यांच्याही खुर्च्या गेल्या, गेल्या त्या कायमच्याच..! गंमत म्हणजे माझ्या खुनाच्या वेळी पाहुणा अडकू नये म्हणून लांब लांब सेटींग करणाऱ्यांनी नंतरच्या काळात कोपर्डीच्या ताईच्या न्यायासाठी म्हणे टाहो फोडला होता… काय दैवदुर्विलास म्हणायचा हा..?
आज मात्र त्यातील कोणीच कुठेच दिसत नाही. रस्त्याने बाहेर फिरायला गेले, तरी पूर्वीचा त्यांच्यावरचा आदर आज दिसत नाही, म्हणूनच म्हणते.. एखादं निष्पाप लेकरू कोणामुळे तरी मेलं.. आणि त्याचं घर दुबळे असेल.. न्याय देखील तिच्यासाठी दुबळा असेल…आणि देवाच्या काठीचा आवाज येत नसला, तरी काठीचा आघात मात्र जोरदार असतो…
अनेक घरे यामध्ये संपली.. मग ती राजकीय असतील, प्रशासकीय असतील.. स्वतःला सामाजिक म्हणून घेणारे असतील किंवा आर्थिक दृष्ट्या संपन्न असतील..! कशी मी काल ही कुणाच्या खिजगणतीत नव्हते.. परवा देखील नव्हते! पण मला एक आनंद वाटला..
कुठेतरी कोण तरी जिवंत आहे आणि म्हणून ”ती परत आलीये” असं म्हणत काही जण माझी आठवण ठेवताहेत.. जिवंतपणी मला काही करता आलं नाही पण माझ्या मृत्युनंतर कोणातरी सक्षम ताईला माझ्या नावाने पुरस्कार केला जातोय.. हाच माझ्यासाठी फार मोठा भाग्याचा क्षण!
अर्थात हा पुरस्कार दुबळेपणाचा नाही. अनेक अडथळे, अडचणीच्या वाटा, काट्याकुट्यांचे मार्ग आपल्या धैर्य बळावर उधळून लावत आपला स्वतःचा वेगळा मार्ग जिने शोधला आणि अनेकांच्या उपयोगाला आपले जीवन सार्थकी लागले पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न सुरू केले..! अशा माझ्या एखाद्या ताईला हा पुरस्कार मिळतो तेव्हा तर मला खरोखरच आनंदाचं भरतं येतं… माझं म्हणाले, तर अजूनही अनेक जणांना न्याय द्यायचा राहिला आहे.. मला वाटते देवाची काठी अजूनही त्यासाठी सक्षम आहे.. हा न्याय होतच राहील आणि तोपर्यंत या रस्त्याने मी फिरतच राहील…!
आणि आम्ही भानावर आलो..मंत्रमुग्ध झाल्यासारखं आम्ही ऐकत होतो. इकडे तिकडे पाहिले, तेव्हा तीच नेहमीची उसा- द्राक्षाची शेती.. तोच एकुलता एक रस्ता.. ‘ही वाट दूर जाते’ असं म्हणणारा! अन् त्या रस्त्यावर मी एकटाच तिच्यासारखाच… पण ती मात्र दिसत नव्हती, ती बोलून गेली बरंच काही जगावेगळं तत्वज्ञान..! बारा वर्षापूर्वीची ही कहाणी बारा वर्षानंतर तिच्यासाठी..!











