दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
कोरेगाव तालुक्यातील देऊर येथे जून महिन्यात चोरट्यांनी पावणे तीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरले होते. या प्रकरणी वाठार पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याने चोरीचे सोने वाईतील सराईत गुन्हेगारांचे नेहमीच फुटकळ किमतीत विकत घेणाऱ्या टग्या व्यापाऱ्याला विकल्याची माहिती दिल्याचे समजते.
त्यामुळे काल (दि.३०) वाठार पोलिस स्टेशनचे पोलिस पथक चौकशी साठी संबंधित व्यापाऱ्याच्या दुकानात दाखल झाल्याने सोने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या आधी देखील भुईंज पोलिसांनी त्यास चौकशी साठी ताब्यात घेतले होते. वाठारच्या या चोरीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
१४ जूनच्या मध्यरात्री देऊर येथील शेतकऱ्याच्या राहत्या घरातून चोरट्यांनी सुमारे २ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाठार पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या चोरीसह अन्य घरफोडीचा तपास करत असताना सराईत गुन्हेगार जकल्या हा काही दिवसापूर्वी त्याच्या हाती लागला.
चौकशीत त्याने वाईतील व्यापाऱ्याला ते सोनं विकले असल्याची कबुली दिली. वाठार पोलिसांनी त्या अनुषंगाने शुक्रवारी अचानक त्या व्यापाऱ्यांच्या दुकानदार धाड टाकली. सुमारे अर्धा तास पोलीस त्याच्याकडे चौकशी करत होते. मात्र त्याबाबत अधिक तपशील समजू शकला नाही.
संबंधित व्यापाऱ्याने यापूर्वी ही चोरीचे सोनं घेतल्यामुळे सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवर तो होता. आमदार, एसपी, कलेक्टर, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरिक्षक हे माझ्या ओळखीचे आणि मित्र आहेत अशा ऐटीत तो वावरतो. मात्र आज दिवसभर सराफ बाजार पेठेसह वाईत त्याच्या कथित चौकशीची चर्चा सुरू होती.











