दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील जोर खोऱ्यात अतिवृष्टी झाली. आभाळ फाटले. एकाचवेळी अस्मानी संकटाच्या भयावह स्वरूपामुळे लोक भयचकित झाले. काहींना तर जीवही गमवावाच लागला. . पण त्यातही माय लेकराच्या अतूट प्रेमाची या ऐतिहासिक आणि धगधगत्या जीवघेण्या संकटातही एक कहाणी अधुरी राहिली..!
जोर गावातील ही घटना पुढील कित्येक वर्ष तेथील लोकांच्या स्मरणात राहील. अंगावर काटा आणणार्या या संकटातही मायलेकराची अत्त्युच्च प्रेमाची कहाणी पुढील पिढीला सांगत राहतील. या संकटाच्या काळातही एका महिलेने आपले प्राण पणाला लावून आपल्या शेजारी व नातेवाईकांना संभाव्य दरड कोसळताना पाहून त्यांना घरातून बाहेर पडण्यास सांगून जवळपास ३० व्यक्तींचे प्राण वाचविले.
पण दुर्दैवाचा घाला असा की, एका क्षणात डोळ्याचे पाते लवते न लवतेच काळाने घाला घातला आणि कर्दनकाळ बनून आलेला तो दगडमातीचा लोंढा तिला आपल्यासोबत ओढून घेवून गेला. अनिता पांडुरंग सपकाळ त्या माऊलीचे नाव!. आणि त्या माऊलीच्या पुत्राने आपल्या आईचे प्राण वाचविण्यासाठी स्वत:लाही त्या अवाढव्य अजस्त्र लोंढ्यात झोकून दिले, मात्र तो हरला.. आईला वाचवू शकला नाही आणि स्वतःलाही! मिसरूड ही न फुटलेल्या वयात आपली आई वाहून जाते म्हटल्यानंतर कुठला मुलगा शांत बसेल? पण त्याला तरी काय माहित कि हा जीवघेणा लोंढा आहे?
सचिन पांडुरंग सपकाळ यांनी त्यांची आई अनिता यांना वाचवण्यासाठी त्याच दगडमातीच्या लोंढ्यात धाव घेतली आणि ती देखील त्या मध्ये वाहून गेले. गावातील सर्व जमिनी वाहून गेल्या भातशेती वाहून गेली आणि त्याचबरोबर अनिता सपकाळ (वय ३७ वर्षे) आणि सचिन सपकाळ (वय १७)वाहून गेले. त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी देखील सापडला नव्हता.
या घटनेने वाईच्या उपविभागीय अधिकारी संगीता राजापूरकर देखील हेलावून गेल्या. त्यांनी सांगितले की, वाई तालुक्यांतील जोर गावी २५ जुलै रोजी एनडीआरएफ च्या टीमसोबत उपविभागीय अधिकारी या नात्याने दाखल झाले, भयानक वारा व जोराचा पाऊस याचा सामना करीत आमची महसूलची टिम, महाबळेश्वर ट्रेकर्स चे वीर सोबत शासकीय मदत तसेच ग्रामपरी व शिवप्रतिष्ठान वाई यांनी दिलेली मदत घेवून आमची टिम रवाना झाली. जोर येथे पोहोचल्यावर तेथील भयानक परिस्थीती पाहून खरोखरच हृदय हेलावून गेले..!











