जुन्नर : महान्यूज लाईव्ह
वादळी पावसाने वीजेचा सिमेंटचा पोल शेतात पडला.. या शेतात पडलेल्या वीजेच्या ताराचा स्पर्श होऊन तालुक्यातील बोरी खुर्द येथील पठाडेमळा येथील बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडताना मालकाला वीजेचा धक्का लागू नये म्हणून चक्क कुत्र्याने वीजवाहक तार तोंडात धरली, ओढली.. मात्र कुत्र्याची मालकाप्रतीची कृतज्ञता ना मालकाला वाचवू शकली, ना मालकांच्या वडीलांना… यात कुत्र्याचाही दुर्दैवी अंत झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बोरी खुर्द येथील पठाडेमळा येथील यादव भिमाजी पटाडे (वय ६५ वर्षे) व त्यांचा मुलगा श्रीकांत यादव पटाडे ( वय ३५) हे दोघे आज सकाळी शेतात औषध फवारणीसाठी गेले होते. त्यांच्यासमवेत त्यांचा पाळीव कुत्राही शेतात पोचला होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी वादळी पावसाने शेतातील वीजेचा सिमेंटचा पोल पडला. यात वीजवहन सुरूच होते.
याची कल्पना नसल्याने शेतातील पिकावर औषध फवारणीत गुंतलेल्या यादव पटाडे व श्रीकांत पटाडे यांना अचानक वीजेचा धक्का बसला. वीजेचा धक्का बसला, तेव्हा काहीतरी घडतेय याची कल्पना या मुक्या प्राण्याला आली, कुत्र्याने प्रसंगावधान राखून मालकाशेजारी असलेल्या वीजेच्या तारेला दूर ओढण्याचा प्रयत्न केला. तोंडात वीजेची तार धरून या कुत्र्याने ती ओढली. मात्र यात कुत्र्याचाही जीव गेला.
या घटनेने परिसरात सर्वांनाच धक्का बसला. वादळी पावसाने जुन्नर तालुक्यात दोघांचा बळी घेतला. त्याचबरोबर कुत्र्याच्या शेवटपर्यंत दाखवलेल्या इमानदारीचीही चर्चा गावात व परिसरात सुरू होती. दरम्यान महावितरणवर ग्रामस्थ संतप्त झाले होते.











