राजूरा तालुक्यात कापसाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला
पुणे : महान्यूज लाईव्ह बळीराजा बरंच सहन करतो, मात्र सहनशक्तीपलीकडे गेले की, मग सरकार आणि कोरोनाच काय, आग ओकणारा सूर्यदेखील त्याला रोखू शकत नाही..सूर्याची आणि बळीराजाची दररोजचीच दोस्ती..म्हणूनज आज ४६ अंश तापमानातही बळीराजाने कापूस खरेदीवरून चंद्रपूर आदिलाबाद हा महामार्ग रोखून धरला. शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्यासह इतर पदाधिकारीही सहभागी होते. कापूस खरेदीचे उदासिन धोरण हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक होत असल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर -आदिलाबाद महामार्ग आज शेतकऱ्यांनी रोखून धरला. सीसीआयने शेवटच्या बोंडापर्यंत हमीभावाने कापूस खरेदी करावी ही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. लॉकडाउनच्या काळात कोरोनाचा आपत्ती प्रतिबंधक नियम पाळून सोशल डिस्टन्सिंग ठेवून शेतकऱ्यांनी अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात यापूर्वी मुठभर कापूस जाळण्याचे आंदोलन केले, मात्र त्यास सरकारने दाद न दिल्याने सरकारला जागे करण्यासाठी संचारबंदीच्या काळातही शेतकरी आक्रमक पवित्रा घेऊन रस्त्यावर आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांशी अॅड. चटप व शेतकऱ्यांनी चर्चा केली. यावेळी अॅड. चटप म्हणाले, सरकारच्या चुकीच्या कापूस खरेदी धोरणामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता सरकारने १५ जूनपूर्वी सर्व कापूस खरेदी करावा. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे, त्याचे पंचनामे करून तो कापूस खरेदी करावा. त्यासाठी कापसाची ग्रेड ठरवून त्यानुसार दर द्यावेत. शेवटच्या बोंडापर्यंतचा कापूस खरेदी करावा अशी मागणी आम्ही केली आहे, अजूनही आम्ही सरकार जागे होईल या आशेवर आहोत.