बारामती: महान्यूज लाईव्ह
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील वाडा कुंभरोशी या गावात अडकुन बारामती, इंदापूर, भवानीनगर आणि पुण्यातील 19 पर्यटक अडकले होते. त्यांची सह्याद्री ट्रेकर्स व सारथी ग्रुपच्या सदस्यांनी सुटका केली. घाट रस्ता बंद असल्याने या पर्यटकांना जंगलातील पायवाटेने त्यांनी महाबळेश्वर आणले. तब्बल पंधरा किलोमीटर पावसात जंगलात ते चालत राहिले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासह, महाबळेश्वर प्रशासनाने, वन विभागानेही या पर्यटकांची व्यवस्था केली व त्यांना सहकार्य केले. आम्ही या तीन दिवसात अंगावर काटा आणणारा अनुभव घेतला आणि आम्ही मरणाच्या दाढेतून सुखरूप पोहोचलो असे स्वप्निल जगताप या पर्यटकाने सांगितले.
गेल्या आठवड्यात अतिवृष्टी कोकण आणि कोल्हापूर सातारा सांगली परिसरात झालेल्या अतिवृष्टीने अनेक जीवांना जीवानिशी मुकावे लागले. त्यातच पश्चिम घाटात दरड कोसळण्याच्या सर्वात मोठ्या घटना घडल्या. याच वेळी बारामती, पुणे, सोलापूर आणि भवानीनगर येथील 19 पर्यटक दापोली येथे पर्यटनासाठी गेले होते. दापोलीहून ते प्रतापगड किल्ला पाहण्यासाठी आले आणि याच वेळी महाबळेश्वर व पोलादपूर मार्गावरील घाट रस्ता असल्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद झाली.
त्यामुळे या पर्यटकांना प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडा कुंभरोशी या गावात अडकून पडावे लागले. या गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती, परंतु या घटनेची माहिती मिळताच सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पार्टे, संजय भोसले आणि सारथी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी या पर्यटकांना महाबळेश्वरला आणण्यासाठी नियोजन केले. रस्ते बंद असल्याने या पर्यटकांना जंगलातील पायवाटेने सुखरूप महाबळेश्वरला आणले.
सणसर येथील स्वप्निल जगताप हे या पर्यटकांमध्ये होते. भवानीनगर परिसरातील पर्यटकही यामध्ये सहभागी होते. स्वप्निल जगताप, यांनी सांगितले की, आम्ही तीन दिवस कसे काढले ते आम्हालाच माहित! या तीन दिवसात आम्ही फार मोठा जबरदस्त अनुभव घेतला. अनेकदा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच वेगळ्या किल्ल्यावर तसेच वेगवेगळ्या धबधब्यांचे पर्यटन करण्यासाठी आम्ही येत असतो. मात्र यावेळी अनुभव आलेला अनुभव अतिशय थरारक होता.
दापोली येथून नातेवाईकांना भेटून माघारी निघाल्या नंतर मागील बुधवारी ते महाबळेश्वरकडे निघाले होते. मात्र प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यापूर्वीच जागोजागी त्यांना पाठीमागील रस्ते बंद असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. प्रतापगड ओलांडून ते पुढे घाट रस्त्याने महाबळेश्वर कडे जात असताना रस्त्यातच महाबळेश्वर पोलिसांनी घाटरस्ता बंद केल्याचे त्यांना समजले. त्यामुळे ते पुन्हा परत फिरले.
परत गेल्यानंतर विश्रांतीसाठी व नाश्ता करण्यासाठी एका हॉटेलजवळ ते थांबले असता, नाश्ता करत असताना त्यांना पुढे काही अंतरावर दरड कोसळली असून घाट रस्ता वाहून गेले असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी पटकन वाहने चालू करून ते प्रतापगडावरून खाली निघाले, मात्र पुढे संपूर्ण रस्ता वाहून गेल्याचे समजताच त्यांना पुन्हा परत फिरावे लागले. आता पुढे आणि पाठीमागे कुठेही रस्ता नसल्याने काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला.
शेवटी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि वाडा कुंभरोशी या परिसरातील अतिथिगृह त्यांना काही काळासाठी उपलब्ध झाले, मात्र पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांना पडला. नंतर स्वप्निल जगताप यांनी त्यांचे मित्र आलेल्या तहसीलदार अभिजित देशमुख यांच्याशी संपर्क साधला. देशमुख यांनी महाबळेश्वरच्या तहसीलदारांशी संपर्क साधला आणि त्यानंतर महाबळेश्वरच्या तहसीलदारांनी त्यांची राहण्याची व्यवस्था करतानाच सह्याद्री ट्रेकर्स च्या सदस्यांना या संदर्भात माहिती दिली.
सह्याद्री ट्रेकर्स व सारथी ग्रुपचे सदस्य या पर्यटकांपर्यंत पोहोचले. त्यांनी या सर्व पर्यटकांना जंगलातील पायवाटेने महाबळेश्वरकडे येण्याची सूचना केली आणि त्यानुसार हे सर्वजण तब्बल चार तास, पंधरा किलोमीटर अंतरावर चालत राहिले. अजूनही त्यांच्या गाड्या वाडा कुंभरोशी गावातच आहेत.











