परभणी : महान्यूज लाईव्ह
डीवायएसपी काय धुतल्या तांदळासारखा असतो?… परभणी जिल्ह्यातील सेलूच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याने त्याचे उदाहरण प्रत्ययास दिले आहे. मृत मित्राच्या पत्नीसोबतचे एक संभाषण ऐकल्यानंतर डीवायएसपीने यात तुला सुट्टी नाही, १ कोटी दिले तरच हे प्रकरण मिटेल असे सांगितले…आणि तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले.. तडजोडीअंती १० लाखांचा हप्ता ठरला आणि सेलूचा डीवायएसपी राजेंद्र पाल लाचखोरीत अडकला.
या घटनेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने राजेंद्र गमकरण पाल या डीवायएसपीसह गणेश चव्हाण या पोलिस कर्मचाऱ्यावरही सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लाचखोरीसाठी तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या मित्राचा अपघाती मृत्यू झाला.
३ मे रोजी या मृत्यूची अपघाती नोंद सेलू पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या दरम्यान तक्रारदाराने त्याच्या मित्राच्या पत्नीशी मोबाईलवर केलेले संभाषण व्हायरल झाले. हे संभाषण ऐकून राजेंद्र पाल याने तक्रारदाराला बोलावून घेतले व या प्रकरणातून तुला बाहेर पडायचे असेल तर १ कोटी द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर पाल हा सतत तक्रारदाराला फोन करू लागला.
या धमक्यांमुळे तक्रारदाराने मुंबईत येऊन २२ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या मुख्यालयात तक्रार दिली. विभागाने पडताळणी केली, त्यात पाल हे पैशासाठी धमकावत असल्याचे उघड झाले. त्यावरून तक्रारदारास तडजोड करायला लावून १० लाखांचा हप्ता देतेवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. १० लाख घेतेवेळी पाल हा एसीबीच्या जाळ्यात सापडला.











