सातारा : महान्यूज लाईव्ह
तिकडे डोंगरावरील दरडी कोसळून अनेक घरांमधील निष्पाप जीव देवाघरी गेले. या घटना ताज्या असतानाच पुराचा तडाखा बसलेल्या चिपळूणमधील अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे, जिथे कोरोना पासून वाचण्यासाठी कोविड सेंटरचा आसरा घेतलेल्या रुग्णांना सेंटरमध्ये पुराचे पाणी शिरल्याने व्हेंटिलेटर बंद पडून आपला जीव गमवावा लागला. या सेंटरमध्ये 11 जणांचा बंद पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
चिपळूण मध्ये पुराचे पाणी शिरून अनेक घरांचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये दरड कोसळून अनेक जण दगावल्याची भीती समोर येत आहे. आतापर्यंत 40 जणांचे मृतदेह हाती लागले असून अजून चाळीस जण ढिगाऱ्याखाली दबले असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात हाहाकार उडाला आहे. दुसरीकडे सातारा जिल्ह्यात देखील वाई तालुक्यात मायलेकरांचा मृत्यू झाला. मेढा तालुक्यात भात लावणी करून येणारे एक कुटुंब वाहून गेले. अशा घटना असल्याने संपूर्ण राज्य हळहळत असतानाच एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. जिथे कोणाच्या निष्काळजीपणामुळे नव्हे, तर निसर्गाच्या तडाख्यामुळे कोरोनाच्या 11 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
चिपळूण मध्ये अपरांत हॉस्पिटल मध्ये गुरुवारी पावसाच्या पाण्याचा मोठा लोंढा आला. त्यामुळे कोविड सेंटर मध्ये पाणी झाले. स्थानिकांनी मदतीसाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र कमरेपर्यंत पाणी आणि अंधार पडल्यामुळे व्हेंटीलेटर बंद पडून 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.