दौलतराव पिसाळ महान्यूज लाईव्ह
काल संध्याकाळी दरड कोसळल्यानंतर कोंढावळे – देवरुखवाडी येथे झालेल्या भुस्खलनात दोघा मायलेकींचा मृत्यु झाला.. रायबाई मारुती कोंढाळकर (वय ८५) व भिमाबाई सखाराम वाशिवले (वय ५५) अशी त्यांची नावे आहेत. या दुर्घटनेत ३५ कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. यात ५ जण जखमी झाले असुन त्यांच्यावर वाईत उपचार सुरु आहेत.
देवरुखवाडीतील सर्वांना प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात शेजारीच गणेशवाडी येथे स्थलांतरित केले आहे. प्रशासनाने व स्थानिक ग्रामस्थांनी तसेच आमदार मकरंद पाटिल यांनी मदतकार्य जागेवर पोहचवले. गेले ३ दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वाईच्या पश्चिम भागात हाहाकार माजवला असून देवरुखवाडीवर अचानक काल संध्याकाळी सहा च्या सुमारास अस्मानी संकट कोसळले.
अचानक धरणीकंप जाणवल्याने अनेकजण घराबाहेर धावले. इतक्यात भुस्खलन होऊन डोंगराचा माेठा मलबा घरावर कोसळताना दिसला. यामुळे घाबरुन जाऊन नागरीक लांब पळाले. वीजपुरवठा बंद व मोबाईलला रेंज नसल्याने इतर शेजारील ग्रामस्थांना तातडीने मदतीला बोलावता आले नाही. बाजुच्या गावातील व देवरुखवाडीतील वाचलेल्या ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले.
काही वेळातच आमदार मकरंद पाटिल व प्रशासनही दोन जेसीबी मशिन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यामुळे २० ते २५ लोकांना रात्रीच मलब्यातून बाहेर काडून त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले. यामध्ये ५ घरे भुईसपाट झाली आहेत तर उर्वरित १२ घरात मलबा शिरला आहे. काही घरांना तडे गेले आहेत. यात शंकर राजाराम कोंढाळकर, पूनम राजाराम कोंढाळकर, रुद्र शंकर कोंढाळकर, तानुबाई गणपत कोंढाळकर, अश्वीनी रामदास कोंढाळकर या जखमींना तातडीने उपचारासाठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या ठिकाणी ५० च्या वर जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरुच होते. मात्र पडणार्या पावसाने बचावकार्य रात्री १.३० च्या सुमारास थांबविण्यात आले. दुसर्या दिवशी आज सकाळी ९ वाजता पुन्हा बचावकार्यास सुरुवात करण्यात आली. दोन पोकलेन मशिनच्या सहाय्याने मलबा हटविण्यात आला.
सकाळी ११.३० च्या सुमारास ७ ते ८ फूट खाली राईबाई व भिमाबाई यांचे मृतदेह काढण्यात प्रशासनालाला यश आले. यावेळी मकरंद पाटिल, प्रांताधिकारी संगिता राजापुरकर चौगुले, तहसिलदार रणजीत भोसले, उपविभागिय पोलिस अधिकारी शितल खराडे-जाणवे, पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, सार्वजनीक बांधकाम विभागाचे श्रिपाद जाधव, तालुका वैदकीय अधिकारी डाँ. संदिप यादव, वनविभागाचे महेश झांजुर्णे, पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, मोहन चव्हाण, आनंद चिरगुटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट दिली. ठेकेदार किरण काळोखे, नंदकिशोर परदेशी, विजय चव्हाण यांनी स्वखर्चाने जेसीबी, पोकलँन मशिन देवुन सहकार्य केले.
या दुर्घटनेत सुमारे ५० ते ६० जण उघड्यावर पडले असून त्यांना कपडे, जेवण बनविन्याचे साहित्य, जिवनावश्यक वस्तू, वीजपुरवठा नसल्याने बॅटर्या आदी साहित्याची तातडिने गरज असुन दानशूर संस्था व व्यक्तिंनी मदत करण्याचे आवाहन सरपंच धोंडिबा कोंढाळकर यांनी केले आहे.