पुणे : महान्यूज लाईव्ह
आम्ही त्यांना कोरोना योध्दा म्हणालो; त्यांनी आमचा खिसा कापला.. आम्ही त्याला देवदूत म्हणालो.. त्यांनी आमच्या समोर देवदूतामागचा सैतानी चेहरा लपवला.. गेल्या वीस वर्षात कधी झाली नाही; एवढी वैद्यकीय लुट कोरोनाच्या उपचारादरम्यान झाली… सरकारने समिती नेमल्या, तपासणी केली.. सरकारी अधिकारी देखील मांजराला उंदराची साक्ष अशा पद्धतीने अगदी हातचा राखून तपासणी करताना दिसत होते.. पण ते करून देखील पुणे जिल्ह्यातील साडेअठरा हजार रुग्णांचे दवाखान्यांनी १५.५० कोटी रुपये लुटले! मग खरोखरच किती लूट झाली असेल?
पुणे जिल्ह्यात 100 दवाखान्यांनी खोऱ्याने पैसा ओढला.. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले.. कारण जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ४९१ बिलांची तपासणी जिल्हा प्रशासनाने केली. त्यातून कोरोना रुग्णांची तब्बल १५ कोटी ६३ लाख ७९ हजार रुपयांची वस्तुनिष्ठ बिलापेक्षा अधिक रक्कम आकारली गेली हे उघड झाले. जिल्हा प्रशासनाने लेखापरीक्षकांची एक स्वतंत्र टीम यासाठी नेमली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण भागातील १०० दवाखान्यांचा समावेश
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना बाधितांकडून अवाजवी बिले आकारली गेली याचा अतिरेक झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी ही बिले तपासण्याचा निर्णय घेतला दीड लाख रुपयांवरील रकमेच्या बिलांची पूर्व तपासणी करण्यात सुरुवात झाली. आत्तापर्यंत 18500 बिले तपासून झाली आहेत तर या बिलांमध्ये 15 कोटी 50 लाख रुपये अधिक आकारले गेल्याचे दिसून आले.
अर्थात तसे पाहिल्यास याहून अधिक रक्कम आकारली गेलेली आहे. मात्र सरकारने जे दर ठरवून दिले होते ते खाजगी दवाखान्यांशी चर्चा करून ठरवले होते. वस्तुतः ते दर देखील एकूण मिळणाऱ्या सुविधांपेक्षा अधिक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे रुग्णालयाने जी बिले दाखवली आहेत, ती प्रत्यक्षातील बिलापेक्षाही कमी आहेत असे सांगितले जाते.
विभागनिहाय झाली तपासणी
पुणे शहरातील १७२४ बिलांची तपासणी झाली. यामध्ये ५ कोटी २० लाख ९९ हजार रुपये अधिक आकारले गेलेले आढळून आले. पिंपरी-चिंचवडमध्ये ५ हजार ३४५ रूग्णांवर उपचार झाले, यामध्ये ६ कोटी ९५ लाख ३७ हजार रुपये अधिक आकारले गेलेले आढळून आले.
पुणे ग्रामीण भागातील ११ हजार ४२२ रूग्णांवर उपचार झाले. यामध्ये ३ कोटी ४७ लाख ७९ हजार अधिक आकारले गेलेले आढळून आले. एकूण १८ हजार ४९१ रुग्णांकडून १५ कोटी ६३ लाख ९९ हजार अधिक आकारले गेलेले आढळून आले.











