सोलापूर : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील भोरपाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातही कैदी पळून गेल्याची घटना घडली आहे. माढा उपकारागृहातून गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणारे ४ कैदी सोमवारी (ता. १९) कारागृहातून पळून गेले. पळून गेलेल्या कैद्यांच्या तपासासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांची पथके रवाना झाली असून आजूबाजूंच्या जिल्ह्यांमध्ये कैद्यांचा शोध घेतला जात आहे.
शस्त्र बाळगल्याप्रकरणी तुरुंगात असलेला अकबर सिध्दाप्पा पवार याने आजारी पडल्याचा बहाणा केला. पोटात दुखत असल्याचा व फिट आली असल्याचा बहाणा केल्यानंतर त्याला उपकारागृहातील सुरक्षारक्षकांनी दवाखान्यात नेण्याची तयारी सुर केली. तेव्हा खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेला आकाश उर्फ रॉकी भालेकर, बाललैंगिक अत्याचार कायद्याखाली अटकेत असलेला तानाजी नागनाथ लोकरे व बनावट चलनी नोटा प्रकरणी गुन्हा दाखल असलेला शिवाजी केचे या तिघा कैद्यांनी याच वेळी सुरक्षारक्षकांना धक्का मारून धूम ठोकली.
पोलिसांनी या प्रकरणी जिल्ह्यात नाकाबंदी केली असून पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी चौघांचा शोध घेत आहेत. पंढरपूर आषाढी वारीचा ताण असतानाच पोलिस प्रशासनावर या पळापळीने आणखीच ताण आला आहे.











