मुंबई : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने राज्यातील निराश तरुणाईच्या मनाची जाण ठेवत आता विविध शासकीय नोकर भरतीला हात घातला आहे. पोलिस भरतीनंतर आता राज्यात दोन वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरतीचीही प्रक्रिया सरकारने खुली केली आहे. टीईटी या शिक्षक पात्रता परीक्षेचा कालावधी सरकारने ठरवला असून ही परिक्षा आता १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार असून टप्प्याटप्प्याने ४० हजार शिक्षक भरती होणार आहे.
पहिल्या टप्प्यात ६ हजार शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार असून राज्यात सध्या रिक्त असलेल्या ४० हजार शिक्षकांच्या जागा भरेपर्यंत ही भरती प्रक्रिया सरकार सुरू ठेवणार आहे. सन २०१८ नंतर राज्यात टिईटी परीक्षा झालेली नाही, गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रभावाचाही परीणाम यावर झाला आहे. मात्र आता कोरोना असला तरी राज्यातील तरुणाई नैराश्यात जाऊ लागल्याने सरकारने पुढील धोका ओळखून ही भरती प्रक्रिया वेगाने करण्याचा विचार करीत, पहिल्या टप्प्यात ६ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.











