चौघावर गुन्हा दाखल, अजब चोरीची जिल्ह्यात चर्चा
इंदापूरः महान्यूज लाईव्ह
उजनीचा काठ आणि माशांची बाजारपेठ हे जणू इंदापूर तालुक्याचे अर्थकारणाचे आणखी एक केंद्र आहे परंतु या अर्थकारणाच्या केंद्राला आज एक धक्का बसला, जेव्हा शेततळ्यातील मासे चोरीला गेल्याची फिर्याद घेऊन एक शेतकरी बिगवन पोलीस ठाण्यात गेला. सोन्या चांदी पेक्षाही चोर माशाला पसंत करतात हे पाहून पोलिसांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. अर्थात ही मासेचोरी एक दोन रुपयांची नसून तब्बल पाच लाख रुपयांची असल्याने पोलिसांनी याचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे.!
पोंधवडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी बापूराव पवार त्यांच्या शेततळ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला असून पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शेतकरी बापूराव पवार यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बापूराव पवार यांनी शेततळ्यात मत्सशेती केली होती. त्यांनी 15 महिन्यांपूर्वी सिप्रॅनिस आणि तिलापिया जातीच्या माशांचे बीज तळ्यात सोडले होते. 7 जुलै रोजी शेततळ्यातील मासे चोरीला गेल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले. हे मासे शेजारीच राहणाऱ्या लोकांनी चोरल्याचा पवार यांचा थेट आरोप आहे. चोरीला गेलेल्या माशांची किंमत 5 लाखांपेक्षा जास्त असल्याचा दावा पवार यांनी केला आहे.
15 महिन्यांपूर्वी सिप्रॅनिस प्रजातीचे 5 हजार आणि तिलापिया प्रजातीचे 7 हजार बीज सोडले होते. शेततळ्यातील मासे हे 300 ते 500 ग्रॅमचे झाल्याचे पवार यांनी पाहिले होते. शेततळ्यातील मासे विकण्यासाठी ते व्यापाऱ्यांना भेटले. व्यापाऱ्यांसोबत व्यवहारही ठरला. पण जेव्हा मासे पकडायचे ठरवले, तेव्हा तलावातून मासेच गायब झाल्याचे निदर्शनास आल्याची तक्रार पवार यांनी दिली आहे.











