पुणे : महान्यूज लाईव्ह
गतवर्षापासूनच कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच यात्रा-जत्रा आणि कार्यक्रमांनाही बंदी आहे. राज्यात कायद्यानुसार बैलगाडा शर्यत आयोजित करण्यास बंदी आहे. या पार्श्वभूमीवर, बैलगाडा शर्यत भरविणे, कायद्याचे उल्लंघन करणे तसेच पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी 10 ते 12 जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (दि. 17) सकाळी 10 च्या सुमारास कात्रजजवळील गुजरवाडी येथे ही घटना घडली.
संतोष अशोक ननवरे ( वय 46, रा. गोकुळनगर, कोंढवा), योगेश बाळासाहेब रेणुसे (वय 29, रा. नेरावणे, वेल्हे), मयूर दिलीप शेवाळे ( वय 26, रा. देवाची उरुळी, शेवाळेवाडी), हरिश्चंद्र भागा फडके (वय 52), पद्माकर रामदास फडके (वय 37), पंढरी जगन फडके ( वय 55, तिघेही रा. विहीगर, नेरे, पनवेल), ऋषिकेश चंद्रकांत कांचन (वय 23, रा. उरुळी कांचन), संकेत शशिकांत चोरगे (वय 21), यश राजु भिंगारे (वय 19), संतोष शिवराम कुडले (वय 41, तिघेही रा. भेलकेवाडी, भोर) व राहुल प्रकाश चौधरी (वय 34, रा. वारजे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यानुसार वरील सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार रवींद्र चिप्पा यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कोरोनामुळे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यास बंदी आहे. दरम्यान, शनिवारी पंढरी फडके यांच्यासह एका व्यक्तीने गुजरवाडी येथील डोंगराच्या बाजूला असलेल्या मैदानात बैलगाडा भरविली होती. तेथे बैलांना गाड्यांना जोडून, निर्दयपणे मारहाण करुन, जबरदस्तीने पळवत होते. या प्रकाराबाबत फिर्यादीने आयोजकांसह इतरांना सांगितले. मात्र त्यांनी फिर्यादींशी हुज्जत घातली. त्यांना धक्काबुक्की केली आणि सरकारी कामात अडथळा आणला. त्यानंतर शर्यतीत एक बैल व एक छकडा पळवला. याप्रकरणी 10 ते 12 जणांविरुद्ध कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.











