बारामती : महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील चोपडज परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. या ठिकाणी पिंजरा लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून निरा-बारामती रस्त्यावर बिबट्याने आपले साम्राज्य दाखवून दिल्याने अगोदरच नागरिक दहशतीखाली आहेत, आता त्यात इतरही गावांची भर पडू लागली आहे. त्यामुळे कन्हेरी, काटेवाडीनंतर आता तालुक्याच्या इतरही ग्रामीण भागात बिबट्याने बस्तान बसवल्याने बिबट्यांना देखील बारामती आवडू लागली आहे अशीच गंमतीदार चर्चाही नागरिक करू लागले आहेत.
बारामती तालुक्यातील चोपडज परिसरात याबाबत बिबट्याचा वावर आहे. या बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती येथे दिली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच चोपडज परिसरात बिबट्या असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन ठशांची पाहणी केली, तेव्हा बिबट्याचे हे ठसे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता येथे पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.











