राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड – पाटस ते दौंड राज्यमार्गावर आज दुपारी जो टेम्पोचा अपघात झाला, त्या अपघातातील वाहनचालकाविषयी दुपारी वाटलेली सहानुभूती त्याच्या अगोदरच्या वर्तनाची माहिती मिळाल्याने अगदी धुळीच मिळाली.. टेम्पोचा तो अपघात रस्त्याच्या कामामुळेच नव्हे तर वाहनचालकाच्या मस्तीमुळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यातून समोर आले आहे. या वाहनचालकाने मद्यधुंद स्थितीत पाटस येथे चार ते पाच दुचाकी व इतर वाहनांना धडक देण्याचा प्रयत्न केला, तेथून तो तसाच वाहन चालवत पुढे आला होता..!
दौंड हद्दीत एसआर पेट्रोल पंप जवळील ओढ्याच्या जुन्य़ा पुलावर आज शनिवारी ( दि.17 ) साडेचार वाजण्याच्या सुमारास मालवाहतुक टेम्पो पुलावरून खाली पडला. वाहनचालकाला स्थानिकांनी कसेतरी बाहेर काढले. तो जखमी झाला., त्याच्याविषयी साऱ्यांनाच हळहळ वाटली व तो वाचल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र काही वेळाने हा प्रकार वेगळाच असल्याचे समोर आले. तेव्हा मात्र साऱ्यांनाच चीडही आली आणि पुढे काय नेमके घडू शकले असते याची कल्पना करून अंगावर शहारेही आले.
या अपघातील वाहनचालक हा मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहनचालवत रस्त्यावरून पुढे सुसाट जात होता, पाटस येथे या वाहनचालकांना चार पाच दुचाकी आणि इतर वाहनांना चिरडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून वाहने बाजूला घेतली, म्हणून ते बचावले अशी माहिती टोलनाक्यावरील सूत्रांनी दिली.
दरम्यान, या अपघातानंतर अवघ्या पंधरा मिनिटात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटस – दौंड राज्यमार्गावर झालेल्या अपघाताच्या घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. अजितदादांचा ताफा तेथून निघाला होता. गर्दी जमल्याचे व तेथे अपघात झाल्याचे पाहून दादांनी वाहने थांबवली. घटनेची माहिती घेतली. तेव्हा स्थानिकांनी दादांच्या कानावर या कामातील त्रुटी व ठेकेदारासंदर्भातील तक्रारी सांगितल्या. त्यानंतर पवार यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या व तेथून ते मार्गस्थ झाले.











