माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, – कोरोना काळात पोलिसांची व्यस्तता आणि दारूची मागणी ही संधी साधून अवैध व्यवसायिकांनी पुन्हा गावठी दारू बनवण्याचा सपाटा सुरू केला होता. राजगड पोलिसांना माहिती मिळताच तातडीने काल रात्री एका गावठी हातभट्ट्यांवर छापा टाकून तब्बल दारू रसायनसह २३ हजार ८०० चा मुद्देमाल जप्त करून दारू तयार करणाऱ्यांना राजगड पोलिसांनी पुन्हा चौदावे रत्न दाखवले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे विशेषत: महिला वर्गातून कौतुक होत आहे.
करंदी खे. बा. ( ता. भोर ) या गावच्या हददीत बोरीचा माळ येथील झाडाझुडपांचे आडोशाला गावठी हातभट्टीवर राजगड पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. यावेळी दोन लोंखडी ड्रममध्ये गावठी हातभटटीची दारू तयार करण्यासाठी लागणारे २ हजार लिटर कच्चे रसायन, एका प्लॅस्टीकचे कॅनमध्ये ३० लिटर दारू, गावठी हातभटटीची तयार दारू करण्यायाठी लागणारे जळाऊ लाकूड असा एकूण २३ हजार ८०० रूपयांचा प्रोव्हिशनचा माल आरोपीने बाळगला होता. दरम्यान कारवाई करतानाच लॉकडाऊन पाळून अवैध धंदे बंद करण्याची तंबीही यावेळी राजगड पोलिसांनी दारू गाळणाऱ्यांना दिली.
आकाश रवींद्र कुंभार (वय २५ रा. करंदी खे.बा. ता. भोर ) असे गावठी दारू तयार करून विक्री करणाऱ्या आरोपीचे नाव असून पोलीस नार्इक भगीरथ एकनाथ घुले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक पी.के.भोसले करीत आहेत. पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रमोद भोसले, हवालदार कुंडलिक माने, पोलिस नाईक भगीरथ घुले यांनी कारवाईत भाग घेतला होता. दरम्यान,पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राजगड पोलिसांनी गावठी दारू विक्री विरोधात जोरदार धाडसत्र सुरू केले आहे. गावठी दारू विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिली.











