माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हॉटेल व्यवसायिकांना फक्त पार्सलची सुविधा देण्याची परवानगी असताना देखील विकेंड लॉकडाऊनचा नियमाचा भंग केल्याप्रकरणी पुणे – सातारा महामार्गावरील हॉटेलवर राजगड पोलिसांनी धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
पुणे – सातारा महामार्गावरील हॉटेल व्यवसायिक ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून खाद्यपदार्थाचे विक्री करत असल्याची निदर्शनास आल्याने हॉटेल पुणेरी, हॉटेल जयभवानी, पलंगे बिर्याणी, बार्बेक्यू मिसळ हाऊस, हॉटेल कैलास, हॉटेल चुलमटण, हॉटेल सुर्वेज, घोलप बिर्याणी, हॉटेल न्यू पिंगारा, हॉटेल बालाजी आदी हॉटेलवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भारतीय दंड विधान कलम १८८, २६९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विनापरवाना चालू असलेल्या इतर ३७ आस्थापना वर दंडात्मक कारवाई करून १८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
तसेच विनामास्क फिरणाऱ्या ८२ व्यक्तीनंवर दंडात्मक कारवाई करून, ४१ रूपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच हद्दीतील ज्या घरमालकानी भाडेकरूंची माहिती पोलिस स्टेशनला दिली नाही अशा ४ घरमालकांवर कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, उपनिरिक्षक निखील मगदुम, उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलीस हवालदार कुंडलिक माने, अजित माने, भगीरथ घुले, संतोष तोडकर, कॉन्स्टेबल सोमनाथ जाधव यांनी केली आहे.
मनोजकुमार नवसरे, सहायक पोलिस निरीक्षक ( राजगड ) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार वेळेवर आस्थापना बंद करणे तसेच विकेंड लॉकडाऊनचा नियमाचा भंग करणाऱ्या हॉटेल मालक आणि चालक यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असुन पर्यटक यांच्यावर सुद्धा कारवाई सुरू आहे”











