सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
सख्खा भाऊ पक्का वैरी या वाक्याचा प्रत्यय इंदापूर तालुक्यात पहावयास मिळाला. जमिनीच्या वादातून अनेक ठिकाणी खून झालेल्या घटना समाजात घडत असताना मागील काही वर्षांपूर्वी आगोती नंबर 1 येथे सख्या भावानेच जमिनीच्या वादातून भावाचा खून केल्याची घटना घडली होती. नेमकी तशाच घटनेची पुनरावृत्ती त्याच गावात घडल्याने खळबळ उडाली आहे. सख्ख्या भावाने व दोन पुतण्यांनी मिळून भावाचा जमिनीच्या वादातून खून केला. त्यामुळे काही काळासाठी शांत झालेला उजनी काठ पुन्हा एकदा खून प्रकरणानेे हादरून गेला आहे.
प्रभाकर विठ्ठल पवार (वय 52 वर्ष, सध्या राहणार मोहन नगर, पिंपरी चिंचवड, पुणे मूळ राहणार अगोती नंबर 1 तालुका इंदापूर जिल्हा- पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ज्ञानदेव विठ्ठल पवार (वय 55 वर्ष ) सुधीर ज्ञानदेव पवार (वय 31 वर्ष), शरद ज्ञानदेव पवार (वय 34 वर्ष) सर्व राहणार अगोती नंबर 1, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत प्रभाकर विठ्ठल पवार यांचे मेहुणे राजकुमार वसंतराव जाधव (रा. सराफवाडी ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना शनिवारी (10 जुलै 20 21) रात्री 08 ते रविवारी (दिनांक 11 जुलै 2021) रोजी सकाळी साडेनऊ वाजताचे दरम्यान मौजे अगोती नंबर 1 तालुका इंदापूर जिल्हा पुणे गावचे हद्दीत संजय आवताडे यांचे केळीचे शेतात घडली.
प्रभाकर विठ्ठल पवार यांचा त्यांचा सख्खा भाऊ ज्ञानदेव विठ्ठल पवार व पुतणे सुधीर ज्ञानदेव पवार व शरद ज्ञानदेव पवार (सर्व रा. अगोती नंबर 1, तालुका इंदापूर जिल्हा पुणे) यांनी संगनमत करून जमिनीच्या वादाचे कारणावरून केबलच्या टॅगने गळा आवळून खून केला. यानुसार इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी मयताचा भाऊ ज्ञानदेव विठ्ठल पवार याला इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरगावकर व इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.











