शिरूर : महान्यूज लाईव्ह
सी एस आर फंडाचे आमिष दाखवून शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महाठकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत शिरूर तालुक्यातील आंबळे गावाचे सरपंच सोमनाथ शिवाजी बेंद्रे (ता. शिरूर जि.पुणे )यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ९ जुलै रोजी त्यांचे मोबाईल नंबर वर अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने आपले नाव अनिरुद्ध टेमकर असे सांगत मी इंडियन ऑईल कार्पोरेशन कंपनीचा सी.एस.आर कन्सल्टंट बोलत असल्याचे सांगितले.
इंडियन ऑईल कार्पोरेशन कंपनीकडून सी.एस.आर फंड गावाकरिता देणार असून त्याकरिता गावचा कोड ओपन करण्यासाठी त्यांचे बँक ऑफ बडोदा या बँकेच्या खात्यावर दहा हजार रुपये फोन पेच्या माध्यमातून त्यांचे मोबाईल नंबर 90 11 43 98 81 वर पाठविण्यास सांगितले. त्यापैकी नऊ हजार पाचशे रुपये चोवीस तासात रिफंड होतील असे सांगून सोमनाथ बेंद्रे यांचे व्हाट्सअप वर गावाकरिता सी.एस.आर मधून कोण कोणते काम केले जाणार याची माहिती पाठवली.
कामाचे स्वरूप व गावाच्या विकासाकरिता सोमनाथ बेंद्रे यांनी दहा हजार रुपये फोन पे केले होते. परंतु 24 तासात नऊ हजार पाचशे रुपये रिफंड झाले नाहीत. व अनिरुद्ध टेमकर यांना संपर्क केला असता त्याचे फोनवरील बोलणे त्यांना समाधानकारक वाटले नाही. त्यादरम्यान शिरूर तालुक्यातील आंबळे गावाजवळील आंधळगाव, शिरसगाव काटा, गणेगाव दुमाला, कुरुळी, कोळगाव डोळस या गावातील सरपंचाची देखील अशा प्रकारे फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने सोमनाथ बेंद्रे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे दहा जुलै रोजी फिर्याद दाखल केली.
घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमण्यात सांगितले. त्याप्रमाणे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे ,पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, पोलीस हवालदार सचिन गायकवाड पोलीस नाईक अजित भुजबळ, मंगेश थिगळे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जावळे यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपी अनिरुद्ध टेमकर याची माहिती प्राप्त करून घेतली.
सदर चा आरोपी हा ( कान्होबा वाडी ता. गंगापूर जि. औरंगाबाद ) येथील राहणारा असून तो आज रोजी औरंगाबाद येथून मुंबईला जाणार असले बाबत गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने नेमलेल्या तपास पथकाला योग्य माहिती व सूचना देऊन औरंगाबाद पुणे हायवे रोडवर आरोपीचा शोध घेण्या बाबत कळविले. त्याप्रमाणे आरोपीचा शोध घेत असताना तपास पथक हे कोंढापुरी परिसरात हायवेवर आरोपीचा हायवे रोडवर असताना आरोपी हा शिक्रापूर चाकण रोड ने मुंबईकडे निघाला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्याचे नाव अनिरुद्ध बाबासाहेब टेमकर ( वय 32 रा. कान्होबा वाडी गंगापूर ता. गंगापूर जि. औरंगाबाद ) असल्याचे सांगितले.
त्याचेकडे गुन्ह्याचे या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देवून शिरूर तालुक्यातील आंधळगाव, शिरसगाव काटा, गणेगाव दुमाला, कोळगाव डोळस व इतर ग्रामपंचायतींच्या सरपंचांना एसआर फंडाचे आम्ही दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपीला शिरूर पोलीस स्टेशन येथे यांचे ताब्यात देण्यात आले असून अशा प्रकारे आणखी काही ग्रामपंचायतीची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याबाबत पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांनी आवाहन केले आहे.











