बारामती : महान्यूज लाईव्ह
आपण अमेरिकेत गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी करीत आपण तपासासाठी भारतात आल्याचे सांगून टेक्सटाईलसाठी लागणारा माल कमी किंमतीत मिळवून देतो असे सांगून बारामतीतील एमआयडीसीत राहणाऱ्या अमित अप्पासाहेब चव्हाण उर्फ राहूल पाटील (रा. पाटण जि सातारा) याने पुण्यातील टेक्सटाईल डिझायनर तरुणीला ९ लाख ६५ लाखांचा गंडा घातला. पुण्याच्या चतुःश्रुंगी पोलिसांनी त्याला बारामतीतून अटक केली.
काल पोलिसांनी अमित चव्हाण यास बारामतीतील एमआयडीसी परिसरातून अटक केली. अमित चव्हाण व या टेक्सटाईल डिझायनर तरुणीची डेटिंग अॅपवर ओळख झाली. या ओळखीतून चॅटींग सुरू झाले. मार्च महिन्यात अॅपवर संपर्कात आल्यानंतर अमित चव्हाण याने मी राहूल पाटील असे नाव सांगत आपण अमेरेकित गुप्तचर यंत्रणेत अधिकारी आहे, आमचे १४५ देशांमध्ये काम चालते, मात्र भारतात सध्या एका तपासासाठी आलो आहे असे सांगत या तरुणीला विश्वासात घेतले. धायरी येथील या २८ वर्षीय तरुणीबरोबर चाकण परिसरात काही दिवस हा आरोपी राहीला. आरोपीने तिच्याशी लग्नाचीही बोलणी केली. काही दिवसांनंतर आपला फोन आणि लॅपटॉप फॉर्मेट करण्यात आला असून तपास संस्थेकडून तुझ्यावर पाळत ठेवली जाते, त्यामुळे तातडीच्या नव्या लॅपटॉपची गरज असल्याचे सांगितले. त्यावर त्या तरुणीने त्याला अॅपल कंपनीचा एक नवाकोरा एक लाख रुपये किंमतीचा लॅपटॉप घेऊन दिला. मात्र तो त्याने परत केला नाही आणि आपल्या खूप ओळखी आहेत. टेक्सटाईलचे साहित्य कमी किंमतीत गुजरातमधून मागवून देतो असे सांगून चव्हाण याने या तरुणीकडून व्यवसायासाठी तिने ठेवलेले बचतीतील ८ लाख ६५ हजार रुपये आपल्या बॅंक खात्यात जमा करून घेतले.
दोन महिन्यानंतर आपण पुरते फसवले गेल्याचे या तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली व तक्रार केली. तेव्हा आरोपी हा पाटण जि. सातारा येथील असून तो सध्या बारामतीतील असल्याचे निष्पन्न झाले. चतुःश्रुंगी पोलिसांनी त्यावर पाळत ठेवून बारामतीतून त्यास ताब्यात घेतले. पुढील तपास चतुःश्रुंगी पोलिस करीत आहेत.











