संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार : तालुक्यातील सुलतानपूर व परिसरातील हजारो शेतकरी आणि व्यवसायीक खातेदार बँकेतील दिड ते दोन महीन्यापासून लिंक फेलच्या नावाखाली व्यवहार ठप्प असल्याने त्रस्त होते. मात्र महान्यूज ने वृत्त प्रसिद्ध केले आणि बॅंक प्रशासन खडबडून जागे झाले. चार तासांत व्यवहार सुरळीत सुरु झाले.
मागील दिड महीन्यापासून येथील सेन्ट्रल बॅकेतील व्यवहार तांत्रीक कारणाने विस्कळीत होते. बँकेत जाणारे शेतकरी, जेष्ठ नागरीक, व्यवसायिक आणि निराधार व्यक्तींना बँकेचे कर्मचारी लींक फेलचे कारण देत होते. यामुळे शाखेतील व्यवहार तात्काळ सुरु करण्यात यावे असे गाऱ्हाणे क्षेत्रीय प्रबंधक अकोला यांचेकडे गावकऱ्यांच्या वतीने मांडण्यात आले होते .
सदर चे वृत्त महान्यूजने सविस्तर प्रकाशीत करताच क्षेत्रीय प्रबंधक अकोला कार्यालयाने तात्काळ दखल घेऊन व्होडाफोन आयडीया नेटवर्क कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून ६ जुलै रोजीच दुपारी ३ वाजेपर्यंत बॅकेतील इंटरनेट सुरु केले .
सुलतानपुर सेन्ट्रल बॅक ऑफ इंडिया नविन जागेत स्थलांतरीत झाल्यापासुन नेटवर्कची समस्या येत होती. अगोदरच्या ठिकाणी बीएसएनएल व इतर कंपनीचे नेटवर्क होते, मात्र नविन ठिकाणी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सर्व्हर व्यवस्थीत काम करीत नव्हते. या बाबत वरिष्ठांना अनेक वेळा कळविले होते. मात्र यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास अन मनस्ताप बातमीमधून सविस्तर प्रकाशीत केले. त्यांची सर्वच स्तरांवर दखल घेतली गेली. अर्थात वरिष्ठांकडे मांडलेल्या समस्यांनाही यामुळे पुष्टी मिळाली व समस्या मार्गी लागल्या. याबद्दल शाखा व्यवस्थापक जीवन गाडेकर यांनीही समाधान व्यक्त केले.











