सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
मला खर्चाला पाचशे रुपये द्या म्हटल्यावर वडिलांनी काहीतरी काम धंदा कर असे सांगितले, यामुळे चिडून वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत रेडियम कट करायचा कटर वडिलांच्या पाठीवर मारुन जखमी केले. हे पाहून आई सोडवायला आली असता पैसे न दिल्यास दोघांना खलास करण्याची धमकी दिल्याने मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात वडिलांनीच पोलीस स्टेशन गाठले व मुलाविरोधात फिर्याद दिली.
दोन दिवसापूर्वीच नागपूर मध्ये मुलाला काहीतरी काम धंदा कर, मोबाईल मध्ये सतत खेळू नकोस असे वडिलांनी सांगितल्याने वडिलांवर मुलानेच वार करण्याची घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती इंदापूरमध्ये काल घडलेली आहे.
हा सर्व प्रकार इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावच्या हद्दीत काल मंगळवारी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. संतोष बाळासाहेब माने (रा. वडापुरी ता. इंदापुर जि.पुणे) असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. बाळासाहेब पंढरीनाथ माने (वय 60 वर्ष व्यवसाय शेती रा. वडापुरी ता. इंदापूर ) यांनी मारहाणीची फिर्याद दिली आहे.
मंगळवारी दिनांक 6 जुलै रोजी वडापुरी गावच्या हद्दीत फिर्यादी बाळासाहेब माने यांच्या घरासमोर साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान संतोष माने याने बाळासाहेब माने यांना ‘मला खर्चाला पाचशे रुपये द्या’ असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी बाळासाहेब माने संतोष यास ‘जरा काहीतरी कामधंदा कर’ असे म्हणाले, त्यावरून संतोष माने याने बाळासाहेब मानेंना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
एवढ्यावरच न थांबता त्याच्याकडे असलेल्या रेडियम कापायच्या कटरने बाळासाहेब माने यांच्या पाठीवर मारून दुखापत केली. यावेळी त्यांची पत्नी रुक्मिणी या मारहाण सोडविण्यासाठी करण्यासाठी गेल्या असता संतोष याने ‘तुम्ही खर्चायला पैसे नाही दिले तर मी तुम्हाला खल्लास करून टाकीन’ अशी धमकी दिली.
इंदापुर पोलिसांनी संतोष माने त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वाघमारे हे करीत आहेत.











