मुंबई : महान्यूज लाईव्ह
मे अखेरपर्यंत केंद्र शासनाने महाराष्ट्रात दीड लाख रुग्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आजघडीला राज्यात ४७ हजार १९० रुग्णांपैकी १३ हजार ४०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. म्हणजे सध्या राज्यात कोरोनाचे ३३ हजाराच्या आसपास ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. हे सर्व तुमच्या प्रयत्नांचे आणि सहकार्याचे फलित आहे. तुम्ही शिस्त पाळली म्हणून हे घडले असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सांगितले.
आज समाजमाध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे तो आपण पाळत आहोत. आजघडीला जनतेच्या आरोग्यावर आलेले संकट दूर करण्यास प्राधान्य मी देत असून जनहितासाठी कृषी, शिक्षण, उद्योग आणि अर्थ या क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत केले आहे. रमजान ईद निमित्ताने राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना सर्वधर्मियांनी आतापर्यंत घरातच सण, उत्सव आणि समारंभ साजरे केले आहेत, तेव्हा घरात राहूनच नमाज अदा करा व संपुर्ण जग कोरोनामुक्त होण्यासाठी अल्लाह कडे प्रार्थना करा. लॉकडाऊन एकदम लागू करणे जसे योग्य नव्हते तसेच लॉकडाऊन एकदम उठवणे ही योग्य नाही. टाळेबंदी उठवतांना काळजीपूर्वक सुरु केलेल्या गोष्टी गर्दी करून आणि बेशिस्तीने वागून पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यातील १०० टक्के नागरिकांना महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे. निवारा केंद्रात असलेल्या साडेपाच ते सहा लाख परराज्यातील मजुरांना नाश्त्यासह दोनवेळेसच्या जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली गेली आहे.
श्रमिकांचे आम्हाला ओझे नव्हते राज्य शासनाला या श्रमिकांचे ओझे नव्हतेच परंतू मजूर घरी जाऊ इच्छित होते त्यांना ट्रेनच्या माध्यमातून घरी जाण्याची मान्यता मिळवल्यानंतर सुमारे ७ लाख मजुर ४८१ ट्रेन्सच्या माध्यमातून त्यांच्या राज्यात गेले. यांच्या प्रवाशी भाड्याची ८५ टक्क्यांची रक्कम केंद्र सरकार राज्याला देईल तेंव्हा देईल परंतू त्या आधी राज्य शासनाने मजुरांच्या प्रवास शुल्कासाठी १०० टक्के खर्च करत आतापर्यंत ८५ कोटीहून अधिक रक्कम उपलब्ध करून दिली आहे. राज्याची रोज ८० ट्रेन सोडण्याची मागणी असतांना केवळ ३० ते ४० ट्रेन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मजुरांची व्यवस्थित नोंदणी करून त्यांना चांगल्या पद्धतीने पाठवले जात आहे त्यामुळेच जातांना परराज्यातील हे मजुर महाराष्ट्राचा जयजयकार करत परतत आहेत. रेल्वेप्रमाणेच राज्याच्या ३२ हजाराहून अधिक बसेसद्वारे ३ लाख ८० हजार मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. यावर राज्य शासनाने ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
रंगभूमी, चित्रपट आणि मालिका चित्रिकरणासाठी योग्य काळजीसह ग्रीन झोनमध्ये मान्यता देण्याचा विचार सुरु आहे.
*खरीपाच्या हंगामाची पूर्ण तयारी करण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बि-बियाणे आणि खतांची उपलब्धता करून देण्यात येत असल्याची व हा एक नवा प्रयोग आहे.
टाळेबंदीत शेती, शेतीविषयक कामे, कृषीमालाची वाहतूक, अवजारांची वाहतूक यावर कधीच बंदी नव्हती आणि राहणार नाही, शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही.
* पुढची लढाई आणखी गंभीर असेल, रुग्णांची संख्या वाढेल, असे असले तरी घाबरून जाऊ नका राज्य शासनाने मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधा उभ्या केल्या आहेत.
* राज्यातील रक्तसाठा कमी झाला असून कोविड-नॉनकोविड रुग्णांसाठी पुढे येऊन रक्तदात्यांनी रक्तदान करावे, राज्याला पुन्हा एकदा तुमच्या रक्ताची गरज आहे.










