आरक्षणाचा प्रश्न विधानसभेत मांडू, आमदार राहुल कुल यांचे आश्वासन.
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : भारतीय जनता पार्टीने आज ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण प्रश्नावर आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी ( दि.26 ) पाटस येथील टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलनाऎवजी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दौंड भाजपच्या चक्काजाम आंदोलनाचा पुर्ण फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
दरम्यान, या आंदोलानात आमदार राहुल कुल यांनी मराठा आरक्षण,ओबीसी समाजाचे आरक्षण आणि मागासवर्गीय समाजाचे पदोन्नती आरक्षणाबाबत आगामी अधिवेशानात भक्कम पणे बाजू मांडून सरकराला जाब विचारू असे आश्वासन दिले.
सर्वाच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय काही दिवासांपुर्वी दिला होता. या निर्णयानंतर ओबीसी समाजात तीव्र संतप्त प्रतिक्रीया उमटल्या, भाजपच्या माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी आघाडी सरकारला याबाबत जबाबदार धरत राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हक्क दिली होती.
त्यानुसार आज शनिवारी ( दि.26) पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथील टोल वसूली नाक्यावर दौंड भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच तालुक्यातील भाजप कार्यकर्ते टोल नाका परिसरात जमा झाले मात्र. याठिकाणी चक्का जाम आंदोलना ऎवजी रस्तालगत धरणे धरत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे रूपांतर भाषणात झाले.
यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले, सरकारच्या नाकार्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात रद्द झाले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण ही न्यायालन रद्द केले. असे असतानाच मागासवर्गीय समाजाचे पदोनत्ती मधील आरक्षण या सरकारने रद्द केले.
न्यायालयात बाजू मांडण्यात आली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा समाजाचे आरक्षण ही या सरकार टिकवता आले नाही. हे सरकार सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. येत्या दोन दिवसाच्या अधिवेशानाच्या कालावधीत आरक्षणचा प्रश्न आक्रमक पणे मांडणार आहे. मराठा समाज, ओबीसी समाज आणि मागास वर्गीय समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.
राष्ट्रवादीतील ओबीसी नेते काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजरे..
भाजप किसान मोर्चाचे प्रदेशध्यक्ष वासुदेव काळे म्हणाले, की शाहु,फुले आंबेडकर आणि पुरोगामी म्हणवाणारे हे सरकार जातीवादी आहे. मराठा समाज,ओबीसी समाजाच्या भावनेशी हे सरकार खेळत आहे. ओबीसी समाजाचे आणि मागासवर्गीय समाजाचे आरक्षण संपले आहे. असे असताना राष्ट्रवादी मधील ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या दावणीला बांधले असून ताटाखालची मांजरे झाली आहेत. अशी टिका काळे यांनी नाव न घेता ओबीसी नेत्यांवर यावेळी केली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभ्यास करून आरक्षणाचा आदादेश काढला होता. मात्र हे आघाडी सरकार सत्तेवर येताच आरक्षण रद्द झाले. न्यायालयात आघाडी सरकारने आरक्षणाचा प्रश्न आभ्यास न करता मांडला, न्यायालयात आघाडी सरकारचे प्रतिनिधी गैरहजर राहिले परिणामी मराठा समाजाचे आरक्षण आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द ठरविले.
मुळात हे राज्य सरकार आरक्षण विरोधी असून त्यांना आरक्षण द्यायचे नाही. जातीद्वेष आणि समाजाच्या भावनेशी खेळत आहे. हे सरकार कोरोना काळातही हप्ते वसुली करत आहे.हे सरकार आरक्षण देण्यास असमर्थ ठरल्यानेच भाजपला आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजाच्या जन्म दिनी आंदोलनाचा लढा उभारावा लागला आहे.
राजकीय आरक्षणाप्रमाणेच भविष्यात ओबीसी समाजाची शैक्षणिक आणि नोकरीमधील आरक्षण ही संपणार आहे.सरकारने त्वरीत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, अन्यथा आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आम्ही होवू देणार नाही असा इशारा वासुदेव काळे यांनी यावेळी दिला.
दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन आमदार राहुल कुल यांनी निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे यांना दिले. या आंदोलनात तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी यवत पोलीसांनी टोल नाका परिसरात चोक बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, महामार्गावर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रूग्णवाहिकांना अडथळा होईल त्यामुळे रस्त्यावर चक्काजाम आंदोलन न करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा भाजपचे नेत वासुदेव काळे यांनी केला.











