माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुलगी ममता शिवदीप लांडे हिने आज केलेल्या भावनिक पोस्टमुळे पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली असून शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात देखील मोठी चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांना त्यांच्याच मुलांकडून सातत्याने बदनामी होत असल्याचा आरोप ममता यांनी केला आहे. या फेसबुक पोस्ट मुळे पुरंदर तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
काय लिहिलंय ममता शिवदीप लांडे शिवतारे यांनी?
ममता या बिहारमधील पोलीस अधीक्षक शिवदीप लांडे यांच्या पत्नी असून, विजय शिवतारे यांच्या कन्या आहेत. त्यांनी आज त्यांच्या पोस्ट फेसबुक पेज वरून एक भावनिक पोस्ट लिहिली आहे ती जशीच्या तशी,
प्रिय पुरंदरच्या बांधवांनो,माता भगिनींनो,
आज दिनांक २२/०६/२०२१ वेळ पहाटे ३:००,ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आय सी यू ICU विभागात बसून हे लिहिण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं.
मी ममता शिवदीप लांडे शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत कवचितच मला पाहिले असेल,मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठ्ठ कारण आहे.
बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य.मला त्यांनी फुलासारख जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिल. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरच स्थान आहे .अश्या माझ्या पित्याची केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अवस्थ आहे.
मागील काही दिवसात फेसबुक वरून होत असलेल्या पोस्ट ने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल अस त्यांना वाटत होतं व आजही वाटत.
मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहीतच आहे . डाॅक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असे सांगितले, माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षापासून बाबा एक दिवसाआड डायलिसिसला जातात.
या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटण्यास आहे नाही. अथवा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सूरु झाले. आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली.
तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार दबाव देण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीच्या गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनय च्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही.
मात्र मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करून ही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अश्याच बदनामीच्या धमक्या देत आहे आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलंत. तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका. आणि बाबाही अविरत पुरंदर साठी आपला जीव ओततील .
आज सर्व काही त्यांच्या सहनशीलतेचा पलीकडे गेलं आहे आणी त्याच धक्क्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आय सी यु मध्ये रात्री २:०० वाजता मी त्यांना घेऊन आली,ऍडमिट केले . माझी देवाला प्रार्थना आहे ,मला बळ दे!!!
काही प्रश्न आहेत, त्यावर नक्की विचार करावा।
१)१९९४ साली घडलेल्या घटना सत्य वा असत्य, आज २७ वर्षानंतर का आठवाव्यात? २) बाबांचा इतका द्वेष असताना त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारे ने २०१८ पर्यंत का सांभाळला? ३) बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली? ४)विनय शिवतारे व विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावलं? ५)वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली, पण मृत्युशय्येवर असलेल्या वडीलांसोबत असा व्यवहार कीतीही वाईट असले तरी कोणी मुलगा करणे योग्य आहे का?











