सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
मेंढराच्या कळपांना घेवून त्यांच्या चा-याच्या शोधात गाव बदलत भटकंती करणा-या मेंढपाळांच्या कळपातील सुमारे पन्नासहून अधिक मेंढ्या अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडल्याने मेंढपाळांत घबराट निर्माण झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी परिसरात अज्ञात आजार जडून लाखों रुपये किंमतीच्या या मेंढ्या मृत्युमुखी पडल्याच्या घटनेमुळे मेंढपाळ हवालदिल झाले आहेत. सध्या शेळगाव, गोतोंडी, निमगाव केतकी च्या परिसरात हजारोंच्या संख्येने मेंढ्या मेंढपाळांच्या आहेत. जिथे मोठी मोकळी जागा आहे, तिथे या मेंढपाळ रात्रीचा मुक्काम करत आहेत.निमगाव केतकी भागात आलेला मेंढपाळाचा कळप हा दौंड तालुक्यातील आहे.
दौंड तालुक्यातील पाटस येथील असणारे गुलाब पोपट खडके या मेंढपाळाच्या कळपातील मेंढ्या अचानक दगावण्याचा प्रकार घडल्याने या आजार कोणता आहे किंवा दुसरे काय आहे हे समजून येत नाही.
येथील मेंढरांचा सुरुवातीस कान व नंतर चेहरा सुजला. त्यानंतर पाय खोडून या मेंढ्यांचा मृत्यू झाला. हा आजार इतरत्र पसरू नये म्हणून तातडीने पशु विभागाने लक्ष घालावे अशी मागणी मेंढपाळ करीत आहे. गुरुवारी साधारण दहा ते अकरा मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर काही मेंढ्या मेंढपाळांनी परिस्थिती पाहून आहे त्या स्थितीत सोडून दिल्या आहेत. मेंढ्या कोणत्या आजाराने मृत्युमुखी पडत आहेत हे पाहणे आता महत्वाचे झाले आहे.