खंडाळा : महान्यूज लाईव्ह
तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी मदत करावी व तक्रारदारांना सदर गुन्ह्यातील आरोपी करू नये यासाठी झिरो पोलिसाने पोलीस शिपायासाठी दीड लाखांची लाच मागितली आणि ही लाच घेताना या खाजगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ताब्यात घेतले. यामध्ये पोलीस शिपायाचाही सहभाग आढळल्याने पोलीस शिपायावरही गुन्हा दाखल केला.
एका पोलीस कर्मचाऱ्याने एका गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी दीड लाखांची लाच मागणे ही गोष्ट महाराष्ट्राच्या पोलीस दलातील लाचखोरी आणि त्याची रक्कम किती वाढली आहे याचेच निदर्शक आहे. सातारा जिल्ह्यातील औंध पोलीस ठाण्यातील चंद्रकांत दादासाहेब शिंदे या पोलिस शिपायाविरूध्द व सुशांत सुरेश वरुडे (वय 35 वर्षे) या खाजगी इसमाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस निरीक्षक अविनाश जगताप, शिपाई राजे, पोलीस शिपाई खरात यांनी सापळा रचला होता. या कारवाईमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुण्याचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी मार्गदर्शन केले.











