खंडाळा : महान्यूज लाईव्ह
पावसाळा सुरू झाला की, साऱ्यांचीच पावले पश्चिम घाटाकडे वळतात.. त्यातही पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूरमधील पर्यटक सातारा जिल्ह्यातील डोंगररांगांकडे वळतात.. पण सावधान..! कोरोना अजूनही संपलेला नाही आणि पोलिसांचे अधिकारही संपलेले नाहीत.. आज सातारा जिल्ह्यात सडा वाघापूर धबधब्याच्या ठिकाणी सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरीतून आलेल्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी कारवाई करून दंडात्मक कारवाई करीत ६७ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
उंब्रज पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी व पेट्रोलिंग दरम्यान ही हुल्लडबाज, विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात आली. संचारबंदीमध्ये शिथीलता आणली असली तरी सरकारचे निर्बंध कायम आहेत. त्यामुळेच वाहनात जादा प्रवासी वाहतूक करणारी वाहने, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे गोरड यांनी सांगितले.
आजची कामगिरी जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय गोरड, फौजदार श्री. पाटील, हवालदार नंदकुमार निकम, संदीप पवार, अमृत आळंदे, अमोल खवळे, विशाल नलवडे, वैभव यादव, सुशांत शिंदे, प्रविण फडतरे यांच्या पथकाने केली.
आज दिवसभर ही कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू केल्यानंतर या रस्त्याने शांतता धोक्यात आणणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला. दरम्यान पोलिसांनी यासंदर्भात कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.