मुंबई : महान्यूज लाईव्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर आज शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घ्या अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याने राज्यात खळबळ उडाली. अर्थात सरनाईक यांच्या पाठीमागे ईडी, सीबीआयचा ससेमीरा लावल्याने हे होत असावे असा अंदाज राजकीय क्षेत्रात वर्तवला जात असला तरी प्रत्यक्षात भाजपकडून शिवसेनेचा मुख्यमंत्री व भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असा प्रस्ताव ठेवून पुन्हा राज्य ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
आज दुपारी भाजपचे नेते नितेश राणे यांनी राज्यात भगव्याचे राज्य येते आहे असे ट्विट करीत हीच ती वेळ असे सूचक विधान केले आहे. अर्थात राणे यांच्या बोलभांड वक्तव्याचा अन्वयार्थ फार घाईने लावला जात नसला तरी पंतप्रधानांनी गेल्या चार पाच दिवसांत मुख्यमंत्र्यांनी दोन ते तीन वेळा चर्चा केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या राजकीय भूकंपाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचे नेते राज्यात सरकार चालवत असतानाच केंद्रातील भाजप सरकारशी छुपी हातमिळवणी करून आहेत असे सरनाईक यांनी लिहील्याने राज्यात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे भाजप वर्तुळातून पसरवल्या जात असलेल्या कुजबुज ब्रिगेडच्या चर्चेनुसार मुंबई महापालिका एकत्रित लढवून, सन २०२४ मधील लोकसभा निवडणूकीत भाजपा ३० जागी तर शिवसेना १८ जागी लढेल व विधानसभेसाठी समसमान जागा वाटप आणि जास्त जागा येतील, तो मुख्यमंत्री असे बोलणे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांदरम्यान झाल्याची चर्चा सुरू आहे.











