दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील चिंधवली गावातील महादेव
संजय पवार (वय २७) हा तरुण एमआयडीसी
मधील एका नामांकीत कंपनीमध्ये अनेक वर्षापासून काम करुन कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावून प्रपंच चालवत होता, पण १५ दिवसांपासून तो नोकरी गमावल्याने निराश होता. आज (दि.१९ ) त्याने राहत्या घराच्या पाठीमागे कृष्णा नदीकाठच्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे चिंधवली गावावर शोककळा पसरली आहे.
चिंधवली येथील महादेव संजय पवार (वय २७) हा तरुण वाईच्या एमआयडीसी मधील एका नामांकीत कंपनीमध्ये कामाला होता. पण गेल्या १५ दिवसांपूर्वी त्याला कामावरून कमी केले.
तेव्हापासून तो आपली नोकरी गेली या मानसिक तणावाखाली होता. त्याचे पर्यवसान त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्यात झाले अशी चर्चा आज गावात सुरू होती.
गेल्या दिड वर्षा पासून कोरोनने वाई तालुक्यातील अनेक गावांमध्ये थैमान घातल्याने जिल्हा प्रशासनाने हा रोग आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण वाई तालुका लॉकडाऊन केला. सर्व व्यवसाय उद्योगधंदे बंद झाल्यामुळे अनेक मुली, महिला व तरुण गोरगरीब मजूर जे छोट्या मोठ्या दुकानांमध्ये अल्प पगारावर काम करायचे, त्यांचा रोजगारच थांबला.
यात अनेक कुटुंबे अक्षरशः होरपळून निघाली
अगदी आपणास मुलगी कोणी देणार नाही याही निराशाजनक विचारात अनेक तरुण ग्रासले आहेत. खचुन गेलेली मानसिकता आणि नशीब साथ देत नसल्याने आज अनेक तरुण नैराश्यात आहेत. त्या पैकीच एकाने आत्महत्या केल्याने चिंधवली गावावर शोककळा पसरली आहे.











