इंदापूर : महान्यूज लाईव्ह
लांडग्याच्या कळपाने शेतक-याच्या शेळ्यांवर हल्ला चढवत शेळ्यांची लहाण नऊ करडे ठार केली,तर इतर नऊ करडांना (पिल्ले) पळवून नेल्याने परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.निमगाव केतकी जवळील कचरवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री नंतर ही घटना घडली आहे.हल्ल्यात ठार व पळवून नेलेल्या मेंढपाळाचे माणिक दत्तु कचरे असे नाव असून सुमारे पावणे दोन लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.
आज सकाळी या घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच कुंडलिक कचरे यांनी तात्काळ वन विभागाला कळवले.इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्या सुचनेनुसार इंदापूरचे वनपाल विठ्ठल खारतोडे, बिजवडीचे वनरंक्षक डी. बी.गवळी व पशुवैद्यक डॉ.एम.पी.काझडे गावकामगार तलाठी गोरक्षनाथ इंगळे यांनी सर्व घटनेचा पंचानामा केला आहे.
यावेळी पुणे जिल्हा सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीकांत करे,गावचे पोलीस पाटील महादेव बरळ, धनाजी कचरे,भीमराव कचरे,लहु कचरे,लक्ष्मण कचरे,संतोष जाधव,शशिकांत मिसाळ,आन्याबा कचरे,सुभाष कचरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
शेळ्यांवर हल्ला केल्याने कचरे यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणी होत आहे.
दरम्यान सरपंच कुंडलिक कचरे यांनी वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना ही माहिती दिली.कचरे यांच्या शेळ्यांचे नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना अधिक-यांना करत कचरे यांना तातडीने मदत देण्याची आश्वासन राज्यमंत्री भरणे यांनी दिली आहे.
मेंढपाळ व शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यात काळजी घ्यावी व आपल्या पाळीव जनावरांना बंदिस्त व सुरक्षीत ठिकाणी जंगली व हिंस्र प्राण्यांचा हल्ला होवु नये याची काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.











