राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे रत्नाकर मखरे यांच्यावर विशेष प्रेम होते ; खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्रातील वादळी व झंझावाती व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे रत्नाकर मखरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब, पिडीत, शोषित, वंचित, कटकरी,उपेक्षित वर्गासाठी वेचले अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत रत्नाकर मखरे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांचे नुकतेच निधन झाले. काल इंदापूर दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मखरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. खा.सुळेंनी रत्नाकर मखरे यांच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्याला उजाळा दिला.
खा. सुळे म्हणाल्या की, रत्नाकर मखरे हे मखरे तात्या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या आक्रमक व वादळी स्पष्ट व्यक्तिमत्वाने त्यांची सर्वत्र छाप होती. आपल्या धाडसी, करारी व निर्भिड स्वभावाचा झंजावात आपण पाहिला आहे. तळागाळातील सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका त्यांची सततची होती.
दरम्यान सुळे यांनी मखरे यांच्या पत्नी श्रीमती शकुंतला मखरे, पुत्र ॲड.राहुल मखरे, संतोष मखरे, ॲड. समीर मखरे यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान सुळे म्हणाल्या की, पवार कुटुंबीय तुमच्या कायम पाठीशी आहे. काळजी करु नका. पवारसाहेबांनी मला आवर्जून सांत्वनपर भेट घेण्यासाठी सांगितले होते असे यावेळी सुळे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.











