संदीप मापारी पाटील, बुलढाणा
बुलढाणा लोणार तालुक्यातील शिवानी पिसा येथील मौजे गुंजापुर येथे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया कंपनी यांच्या कडून सुरू असलेल्या टॉवर उभे करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे येथील नैसर्गिक ओढे व नाले बंद करून टाकले आहेत. अचानक आलेल्या पावसात ओढे व नाले बंद झाल्याने जमिनी वाहून गेल्या. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
या कंपनीने जाण्यासाठी रस्ता हा शेतकऱ्याच्या शेतीलगत वैयक्तिक जेसीबी द्वारा करून घेतला आहे. हे करताना त्यांनी शेताच्या बाजूला पाणी वाहून नेणाऱ्या ओढे व नाले यांची तोंड दाबून व कोंडी करून टाकली. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या सतत पावसामुळे नदी, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत.
त्यामुळे ओढ्या, नाल्या चे पाणी हे वळणाच्या बाहेर निघून वळणाच्या लगत असलेल्या आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या व आजूबाजूला परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोणार तालुकाध्यक्ष अनिल मोरे, सोशल मीडिया सेल अध्यक्ष भागवत मुर्तडकर यांनी भेट घेऊन घेतली व नुकसान झालेल्या पिकाची व शेतीची पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.
दरम्यान आमची मागणी मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा लोणार तालुकाध्यक्ष अनिल मोरे यांनी दिला. या वेळी लोणार तालुका उपाध्यक्ष अनिल लांडगे, सोशल मीडिया सेल तालुका अध्यक्ष भागवत मुर्तडकर, शिवणी पीसा येथील सरपंच विकास पिसे, नाथा पिसे, एकनाथ पिसे, गणेश पिसे व गावकरी आणि शेतकरी उपस्थित होते.











