सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सलग दुसऱ्या दिवशी लावलेल्या सापळ्यात महसूल महसूल खात्याच्या इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील तलाठी राजेश गायकवाड याला आठ हजार रुपयांची लाच घेताना पुण्यामध्ये पकडले. खास लाच घेण्यासाठी हा तलाठी पुण्यामध्ये गेला होता. संग्राम नथ भगत यास देखील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले.
कालच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भोर तालुक्यातील महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यावर लावलेल्या सापळ्यात भोर तालुक्यातील नसरापुर येथे राहणारा तलाठी अडकला. एका संस्थेच्या सातबारावर नोंदी करण्यासाठी त्याने पैसे मागितले होते. आज इंदापूर तालुक्यातील तलाठी या लाचखोरीत सापडला. दोन दिवसात दोन तलाठी लाचखोरीत सापडले असून, कोरोनाच्या काळात देखील शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा विकृत प्रकार तलाठी काही कमी करत नाहीत, असेच चित्र दिसत आहे.
या संदर्भातील माहिती लवकरच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून जारी होण्याची शक्यता आहे. सध्या अजून तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज एक गर्भश्रीमंत तलाठी आठ हजारांची लाच घेण्यासाठी चक्क पुण्याला जातो, ही माहिती इंदापूर तालुक्याच्या महसूल विभागात समजल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली.
दरम्यान या संदर्भात कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार हे वकील असून त्यांनी त्यांच्या अशिलाच्या वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी अर्ज केला होता. मात्र राजेश गायकवाड याने त्यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने याची पडताळणी केली आणि त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, त्यांनी सापळा रचला. त्यामध्ये तडजोडी अंती आठ हजार रुपयांची लाच घेताना राजेश गायकवाड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.











