दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील वनक्षेत्रातील हद्दीत घुसून मेंढ्या चरत होत्या. त्यांना वनक्षेत्रात मज्जाव केल्याने दोन वनकर्मचाऱ्यांवर या चार पाच मेंढपाळांनी हल्ला केला करून जबर मारहाण केल्याची घटना आज गुरूवारी ( दि.17) घडली आहे. दरम्यान, या मेंढपाळांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पाटस कार्यक्षेत्राच्या वनरक्षक पद्मनी कांबळे यांनी दिली.
याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, पाटस येथील काही मेंढपाळ आपल्या मेंढया चारण्यासाठी हिंगणीगाडा हद्दीतील वनक्षेत्रात जात आहेत. मागील दोन तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. या वनक्षेत्रात कामकाज पाहणारे दोन वनकर्मचाऱ्यांनी वनक्षेत्रात आपल्या मेंढ्या चरण्यासाठी आणू नका असे दोन दिवस सातत्याने सांगितले.
मात्र तरीही गुरूवारी हे मेंढपाळ दोन अडीच हजाराच्या आसपास मेंढया घेवून वनक्षेत्रातील हद्दीत विना परवाना घुसले असता, पाटस परिमंडल वनविभागाच्या वनरक्षक पद्मिनी कांबळे आणि वनकर्मचाऱ्यांनी त्यांना वनक्षेत्रातील हद्दीत मेंढपाळांना प्रवेश करण्यास मज्जाव केला, मात्र मेंढ्यांना चरण्यास विरोध केल्याने चार ते पाच मेंढपाळांनी या वनकर्मचाऱ्यांना प्राणघातक हल्ला करून जबर मारहाण केली.
या हल्ल्यात दोन वनकर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, याबाबत वनरक्षक पद्मनी कांबळे यांनी तातडीने पाटस पोलीसांची संपर्क केला असून पाटस पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हल्ला केल्यानंतर हे मेंढपाळ पसार झाले आहेत. या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकरांना कळविले असून संबंधित मेंढपाळांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वनरक्षक कांबळे यांनी दिली.











