माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – खरेदी करण्यापूर्वी सदर जागेचा उतारा देण्यासाठी व खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी ८ हजाराची लाच घेताना वेल्ह्यातील एका तलाठ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली.
मुकुंद त्रिंबकराव चिरके वय ३४ ( सध्या रा. नसरापूर ) असे लाच स्वीकारताना पकडलेल्या तलाठ्याचे नाव असून कोदवडी ( ता . वेल्हा ) येथे चिरके हा कार्यरत होता. तक्रारदार यांच्या संस्थेने वीस गुंठे जागा दामगुड आसनी, ( ता. वेल्हा ) येथे विकत घेतली आहे.
खरेदी करण्यापूर्वी सदर जागेचा उतारा देण्यासाठी व खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी आरोपी मुकुंद त्रिंबकराव चिरटे याने दहा हजाराची तडजोडीअंती मागणी केली होती. यापैकी ८ हजाराची रुपयांची लाच मागणी करून ती लाच रक्कम स्विकारताना त्याला पुणे सातारा महामार्गावरील चेलाडी फाटा ( ता. भोर ) येथील उड्डाण पुलाखाली रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत विभागाचे पुणे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल बिले, वैभव गोसावी, रतेश थरकार, भूषण ठाकूर, चालक जाधव यांनी यशस्वी कारवाई केली. तक्रारीच्या अनुषंगाने दोन साक्षीदार पाठवून पोलिसांनी लाचेच्या मागणीबाबत पडताळणी केली.
यावेळी आरोपी चिरटे याने तक्रारदार यांच्याकडे तडजोड करीत ८ हजार रुपयांची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारली असता, त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी मुकुंद चिरके याच्या विरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
चिरके याच्या कार्यपध्दतीबाबत कोदवडी परिसरात मोठी नाराजी असुन लाचेचे पैसे कमी असतील, तर अंगावर फेकुन देऊन येवढ्यात काम होणार नाही अशी अरेरावीची कृती व वक्तव्य देखील त्याच्याकडुन होत होती अशी माहीती येथील नागरीकांनी दिली.











