विशाल कदम: महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन : एका मद्यपी मुलाने आपल्या वडिलांचा ब्लेडने गळा चिरुन खून केला. त्यानंतर आपण केलेले कृत्य लपविण्यासाठी त्यांचा मृतदेह दोन दिवस घरात लपवून ठेवला हा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तुपे वस्ती परिसरात गुरुवारी (ता. १०) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. अर्थात तो सुनेच्या धाडसामुळेच उघडकीस आला.
रहीम गुलाब शेख (वय-६७, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) हे त्या खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी नयीम रहीम शेख (वय-३५) या दारुड्या मुलास लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नयीम शेख याने सात वर्षांपूर्वी अशाच प्रकारे ब्लेडच्या सहाय्याने आपल्या पत्नीवर वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला होता.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयीम चे वडील रहीम हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. नयीम याने मंगळवारी (ता. ०८) किरकोळ कारणावरून वडील रहीम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. रहीम यांना आजारपणापासून कायमचे मुक्त करतो म्हणून मुलगा नयीम याने “मै तुम्हे बिमारीसे आझाद कर दूंगा’ असे म्हणत पहिला गळा दाबला.
यानंतर गळ्यावर ब्लेडने सपासप वार करुन खून केला. खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह तब्बल दोन दिवस घरातच ठेवला होता. नयीम याची बहिण शहनाज वडिलांना सोडविण्यासाठी आली असता, नयीम याने बहिणीला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प बसवले आणि बहिण शहनाज व दोन भाच्यांना त्याने बेडरुममध्ये डांबून ठेवले.
नयीमने वडील रहिम शेख यांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवला. वडिलांना मारल्यानंतर मागील ३६ तासांपासून मृतदेह कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत घरात पडून होता. आज गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नयीम याने वडील मयत झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. व चार वाजता वडिलांना दफन करणार असल्याचे नातेवाईकांना कळविले. नयीमची पत्नी तिच्या माहेरी राहत होती. परंतु तिला ही बाब समजल्याने तीही सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आली होती.
नयीम याची पत्नी सासऱ्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी रहीम यांच्या मृतदेहाजवळ गेली असता, तिला रहीम यांच्या गळ्यावर वार असल्याचे निदर्शनास आले. यावर नयीमच्या पत्नीने शहनाजला बाजूला घेऊन रहीम यांच्या गळ्यावरील जखमी बाबत विचारणा केली.
त्यावर शहनाजने नयीम याने आपल्या वडिलांच्या समवेत केलेल्या धक्कादायक कृत्याची माहिती नयीमच्या पत्नीने दिली. यानंतर नयीमच्या पत्नीने शहनाज समवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी नयीम याला रहीम यांचा खून केलेल्या संशयावरून ताब्यात घेतले असून, पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार करीत आहेत.











