नाशिक : महान्यूज लाईव्ह
जिल्ह्यातील इगतपुरी येथे काल रस्त्याने पायी जात असलेल्या एका वृध्द महिलेस पोलिस असल्याचे सांगत दोन जणांनी अडवले. काल रात्री एका महिलेला चाकू मारलेला आहे. तुम्ही एकट्या का फिरताय असे म्हणत सोन्याचे दागिने पिशवीत ठेवा, नाहीतर तुम्हाला पाच हजारांचा दंड भऱावा लागेल असे फर्मावले. घाबरून महिलेने लागलीच दागिने काढून पिशवीत ठेवले, तोपर्यंत दोघांपैकी एकाने दुचाकी आणली होती. त्या महिलेची पिशवी एकाने हिसकावली आणि दुसऱ्याने दुचाकी आणून त्यावर त्याला बसवून वेगाने दुचाकी नेली.
या घटनेनंतर इगतपुरी पोलिस ठाण्यात पार्वती रमेश कांबळे, रा. गांधी चौक इगतपुरी यांनी फिर्याद दिली. मात्र या घटनेने राज्यभरात स्नॅचिंगच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. लॉकडाऊन शिथील होताच चोरट्यांनी आता आपला मोहरा पुन्हा चोरीच्या घटनांकडे वळवला आहे.
इगतपुरीतील गिरीजा माता मंदिरासमोर हा प्रकार घडला. चालत निघालेल्या पार्वती यांना थांबवून या दोघांनी आम्ही पोलिस आहोत असे सांगितले. आता पोलिस सांगतोय, म्हटल्यावर आदराने कोणीही थांबतो. या महिलेलाही या भामट्यांनी लॉकडाऊन अजून संपलेले नाही असे सांगत पाच हजार रुपये दंड भऱावा लागेल अशी भितीही घातली. त्यामुळे भीतीने या महिलेने आपले सर्व दागिने पिशवीत ठेवले. पुढील तपास इगतपुरी पोलिस करीत आहेत.











