मुंबई : महान्यूज लाईव्ह
कल्याण येथील द्वारली गावातील हरिभक्त परायण गजानन बुवा चिकणकर याच्याविरोधात अखेर हिललाइन पोलिसांनी सू-मोटो म्हणजे स्वतः गुन्हा दाखल केला आणि पत्नीला मारहाण केल्याबद्दल त्याला अटक केली. मात्र त्याच्या पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार देण्यास नकार दिला.
80 वर्षीय पत्नीला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर गजानन चिकणकर याच्यावर कारवाईसाठी राज्यभरातून सामाजिक दबाव वाढला होता. यानंतर पोलिसांनी काल चिकणकर याच्या पत्नीस भेटून तक्रार देण्याचा सल्ला दिला. मात्र त्याच्या पत्नीने गजानन बुवा चिकणकर याच्या विरोधात कोणतीही तक्रार देण्यास नकार दिला.
मात्र राज्यभरातून असलेला सामाजिक दबाव लक्षात घेत, पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा स्वतः दाखल केला. या दरम्यानच्या काळात गजानन चिकणकर आळंदीला पळून गेला होता. त्याच्या मागावर पोलिस होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घरात पाण्यावरून झालेला वाद हे या मारहाणीचे कारण असल्याचे सांगितले जाते.