विशाल कदम: महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा येथे घडला. रविवारी (ता. ६) सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
प्रतीक्षा चिंतामणी कुंभार (वय-२२, रा. माळी-मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतामणी कुंभार हे एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रतीक्षाने घरातील काम उरकून घेतले. प्रतीक्षा चे वडील चिंतामणी कुंभार सकाळी सात वाजता कामाला निघून गेले. तर त्यापाठोपाठ तिची आई मंगल याही सकाळी नऊ वाजता कामाला निघून गेल्या.
प्रतिक्षाला तिच्या आईने सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास फोन केला, परंतु, ती कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नव्हती. म्हणून आईने तिथेच शेजारी राहत असलेल्या मुलीस संपर्क साधण्याचा निरोप दिला. दरम्यान ही मुलगी कुंभार यांच्या घरी गेली व तिने दरवाजा वाजविला, मात्र घरामधून कोणतीही प्रतिसाद आला नाही. तिने घराच्या खिडकीतून पाहिले असता प्रतिक्षाने साडीच्या साहाय्याने घराच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले.
नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून तिला खाली घेण्यात आले होते. प्रतीक्षाने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











