कोरोनाबाधितांची संख्या पाहता पाहता ४४ वर
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंडला कोरोनाची बाधा होण्याचे सुरू झालेले सत्र थांबायचे काही नाव घेत नाही अशीच स्थिती सध्या असून आज (ता. २० ) नव्याने सहा जवान कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
दौंडच्या ऊपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी ही माहिती दिली. या सहा जणांमुळे आता दौंडला कोरोना रुग्णाची संख्या ४४ झाली आहे. दौंडला वास्तव्यास असलेल्या भारतीय रिझर्व बटालियन कोल्हापूर गट क्रमांक १६ चे सहा जवान तसेच दौंड शहरातील दोन जण अशा आठ जणांचा कोरोनाचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता. मंगळवारीच झालेल्या तपासणीचा अहवाल आज आला असून यामध्ये परत भारतीय रिझर्व बटालीयन कोल्हापूर गट क्रमांक १६ मधील नव्याने सहा जवानांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. आता आरोग्य खात्याने ६१२ जणांचे घशातील द्रवाचे नमुने कोरोना तपासणी साठी पाठवले आहेत, त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. मात्र आता दौंडमध्ये वाढत चाललेल्या कोरोनाग्रस्तांमुळे शहराव्यतिरिक्त गावांमध्येही नागरिक काळजी घेऊ लागले आहेत.










