बारामती : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 25 मे 2021 रोजी फौजदार पदाच्या शारीरिक चाचणी संदर्भात आदेश जारी केला असून शारीरिक चाचणी मधील मानकाच्या बदलामधील एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये मैदानी परीक्षेचे गुण यापुढे केवळ मुलाखतीच्या पात्रतेसाठी गृहीत धरले जातील व ते गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी मोजले जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. मात्र हा निर्णय उमेदवारांवर खूप अन्यायकारक असून तो रद्द करावा अशी मागणी राज्यभरातील उमेदवारांनी केली आहे.
दरम्यान हा निर्णय रद्द करावा अशी मागणी राज्यभरातील उमेदवारांनी केली असून बारामतीत ही सह्याद्री करिअर ॲकॅडमी चे संचालक उमेश रुपनवर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली आहे एमपीएससीने दिलेल्या या पत्रकानुसार मैदानी चाचणीत शंभर पैकी फक्त साठ गुण प्राप्त करणारा कोणताही उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहे खरे तर मैदानी चाचणीचे स्वरूप पाहता गुण कोणताही विशेष सराव न करता उमेदवार प्राप्त करू शकतो असे मत व्यक्त केले जात असून हीच गोष्ट फौजदार पदाच्या परीक्षेसाठी घातक असल्याचे मत राज्यभरातील उमेदवारांनी व्यक्त केले आहे.
यासंदर्भात उमेश रुपनवर म्हणाले, मैदानी चाचणीचे महत्व पूर्णतः संपुष्टात आणणारा हा निर्णय असून महाराष्ट्रातील उपचारासाठी खूप अन्यायकारक आहे. मुळातच यासंदर्भात महाराष्ट्रातील उमेदवार, विद्यार्थी किंवा संघटनेने यासंदर्भात कोणतीही मागणी केली नव्हती. तरीदेखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानक विद्यार्थ्यांवर हा नवीन बदल का लागला हे कळत नाही.
मुळात गुन्हेगारांशी दोन हात करणारा घटक म्हणजे फौजदार असल्यामुळे या पदासाठी बौद्धिक क्षमतेबरोबर शारीरिक चाचणी क्षमता देखील महत्त्वाची आहे. मोर्चे, आंदोलने, गुन्हेगारी टोळ्या, दंगे हे हाताळण्यासाठी बारा-बारा तास प्रसंगी 24 -24 तास काम करणाऱ्या पोलिसांची शारीरिक क्षमता तपासली नाही, तर अशा फौजदारांची शारीरिक क्षमता टिकून राहणार असेल का? हा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा निर्णय बदलावा अशी मागणी आम्ही आमदार रोहित पवार यांच्याकडे केली आहे. असे रुपनवर यांनी सांगितले











