आंबेगाव : महान्यूज लाईव्ह
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव तालुका एकाच दिवसात दोन हत्या झाल्याने ढवळून निघाला. एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या करून त्याला पेटवून देण्यात आले तर एका ठिकाणी महिलेची हत्या करण्यात आली दोन्ही घटना स्वतंत्र असल्या तरी एकाच दिवशी तालुक्यात दोन हत्या झाल्याने राज्यात याची चर्चा झाली.
पहिली घटना काल रात्री आठच्या सुमारास घडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सचिन जाधव यांची पैशांच्या देवाण-घेवाणीतून हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्यापासून जवळ असलेल्या कोंदेवाडी फाट्यावर काल रात्री सचिन जाधव यांचे बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी भांडण झाले.
जाधव यांनी दिलेले पैसे परत मागितले, त्यावरून वाद वाढत गेला आणि थिटे आणि सुर्यवंशी यांनी जाधव यांची हत्या केली. त्यानंतर जाधवांच्याच गाडीत जाधव यांचा मृतदेह टाकला आणि गाडी अहमदनगर जिल्ह्याच्या दिशेने गेले. नगर जिल्ह्यातील कोरथन घाटाच्या दरीत जाधव यांचा मृतदेह पेटवून दिला आणि गाडी तिथेच जवळपास सोडून दिली. पुरावे नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
या घटनेचा तपास सुरू झाला आणि सकाळच्या सुमारास जळालेल्या अवस्थेत जाधव यांचा मृतदेह आढळला. तपासाची चक्र फिरताच थिटे आणि सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान दुसरी घटना तालुक्यातील थोरांदळे येथे घडली. येथील द्रौपदाबाई गिरे यांचा मृतदेह डोक्यावर इजा झालेल्या अवस्थेत आढळला. आदिवासी समाजाच्या द्रौपदाबाई मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. पण आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात त्या सध्या वास्तव्यास होत्या. रात्री त्यांना एक फोन आला आणि त्या घराबाहेर पडल्या. बराचवेळ त्या घरी परतल्या नाहीत म्हणून शोध घेतला असता, जवळच रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला. या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शेवटचा फोन कोणी केला त्याचा शोध पोलीस घेत आहेत.











