राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : तालुक्यातील रावणगाव आणि मळद या गावाच्या शिवेवर आज बुधवारी ( दि. 26 ) सकाळी 9 वाजण्याच्या आसपास मुख्य खडकवासला कालवा अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे, विहीरीवरील मोटारी, जलवाहिन्यांचे नुकसान झाले.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता
दौंड तालुक्यातून गेलेला खडकवासला कालवा सध्या पाण्याने भरून वाहत आहे. हा कालवा रावणगाव व मळद जवळ आज सकाळी अचानक फुटला. यामुळे काही क्षणात परिसर पाण्याखाली गेला. पावसाळ्यात नदी, ओढेनाले पाण्याने तुडूंब भरतात, पुर येतो, अगदी तशीच परिस्थीती याठिकाणी निर्माण झाली. अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे कालव्यालगतच्या शेतपिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले गेले. काही शेतकऱ्यांचे शेतीपंप पाण्याच्या प्रवाहामुळे पाण्याखाली गेले. तर काही शेतकऱ्यांचे पाईप वाहून गेले.
शेतकऱ्यांनी बांधलेल्या शेततळ्यांचे बांध फुटले, ताली फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हा कालवा फुटल्याचे माहिती काही क्षणात मळद आणि रावणगाव परिसरात पसरल्याने पाण्याचा प्रवाह पाण्यासाठी परिसरातील नागरीकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. आपल्या विहीरीवरील मोटारी, पाईप पाण्याखाली जाऊ नयेत म्हणून सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.
या घटनेची माहिती मिळताच रावणगाव येथील पाटबंधारे शाखेचे अभियंता विनय पागे यांनी घटनास्थळी जाऊन परिसराची पाहणी केली व वरिष्ठा अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर संबधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कालव्याच्या पाणी पाटबंधारे विभागाच्या यांत्रिक विभागाच्या मशिनरी बोलवून दुपारी एक वाजता कालवा फुटलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम चालू केले.
पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने या घटनेत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जर हा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला असता तर मोठी दुर्घटना झाली असती. भविष्यात अशा घटना होवू नये यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी गळती होत आहे अशा ठिकाणी वेळीच कालवा दुरूस्तीचे कामे तातडीने पुर्ण करावीत अशी मागणी शेतकरी करीत आहेत.











