सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयाच्या पाण्यासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने होत आहेत. त्याच बरोबर 26 मे रोजी होणारी बुद्ध पौर्णिमा, 31 मे रोजी होणारी राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती, धनगर समाज आरक्षण आंदोलन, कृषि कायद्यासंदर्भात शेतकरी आंदोलन, कामगार कायद्यासंदर्भात कामगारांचे आंदोलन अशा विविध आंदोलनामुळे 23 मे 2021 पासून 5 जून पर्यंत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 1951 चे कलम 37 1 व 3 जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यात लागू केले आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी यासंदर्भात हा आदेश लागू केला असून या आदेशामुळे कोणत्याही राजकीय नेत्याचे पुतळा दहन करता येणार नाही. जमाव करता येणार नाही. मोठ्याने अर्वाच्च घोषणा किंवा वाद्य वाजवता येणार नाही. प्रक्षोभक वक्तव्य करणारे कोणतेही भाषण अथवा कोणतेही लेखन जनतेमध्ये प्रसारित करता येणार नाही. ज्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, अशा पद्धतीचे कोणतेही वर्तन हा या कायद्याचा भंग मानला जाणार आहे.











