दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई – मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण तालुक्यात आढळू लागले. यावर्षी दुसऱ्या लाटेत तर मृत्यूचे प्रमाण वाढले, मात्र गावागावातून शहरात उपचारासाठी येणाऱ्या व उपचारादरम्यान दगावलेल्या रुग्णांवरील अंत्यसंस्कारासाठी ७ हजार २०० रुपये आकारले जात आहेत. त्यानंतरच अग्नीसंस्कार केले जात आहेत, यावरून वाई तालुका शिवसेनेने संताप व्यक्त केला असून नगरपरीषदेने हा खर्च स्वतः करावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
शिवसेनेचे वाई तालुकाप्रमुख अनिल शेंडे, तालुका उपप्रमुख विवेक भोसले, शहराध्यक्ष गणेश जाधव, किरण खामकर, योगेश चंद्रस, नितीन पानसे, संतोष पोपळे, सुरेश चव्हाण, अभिषेक पानसे, संदीप साळुंखे, पंकज शिंदे या कार्यकर्त्यांनी वाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले.
या निवेदनानुसार कोरोना रुग्णाच्या अंत्यविधीसाठी ७ हजार २०० रुपयांची रक्कम स्विकारली जात आहे, ती तात्काळ बंद करावी. शासनाने कोविड साठी दिलेल्या लाखो रुपयांच्या निधीतून हा खर्च करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पैसे घेण्याचे बंद न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही दिला आहे.
आज संपूर्ण जग एका विचित्र अवस्थेतून जात आहे. गेल्या वर्षभरापासून जगाला कोविड संकटाने विळखा टाकला आहे. त्यात वाई तालुक्यातील शेकडो लोकांचे मृत्यू झाल्याने अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत. अशी महाभयंकर संकटाचा सामना करताना लोकांना हातभार व पाठबळ देण्याची गरज आहे. महसूल, वाई पंचायत समिती, आरोग्य विभाग, पोलीस, असे शासनाचे सर्व विभाग एकत्र येऊन प्रयत्न करीत आहेत.
राज्यातील बहुतेक नगरपरीषदा हा खर्च स्वतः करीत आहेत. वाई शहरात मात्र याच्या उलट परिस्थिती आहे. वाईत यासाठी ७ हजार २०० रुपये आकारले जात आहेत. अगोदरच लॉक डाऊन, कधी संचारबंदी असे नियम लावल्यामुळे सर्व उद्योगधंदे, दुकाने व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवून नागरिकांना घरातच बसावे लागत आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने पैसा नाही. अशावेळी तरी अंत्यसंस्कार मोफत करावेत असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.











