पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यात संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना घडली असून गुरूवारी संध्याकाळी आईवडीलांच्या दुधाच्या उपकाराला विसरलेली पिढी पाहायला मिळली. कात्रज- देहू रोड परिसरात घडलेल्या घटनेत बहिण भावाच्या भांडणात वडीलांनी बहिणीची बाजू घेतल्याचा राग आल्याने १३ वर्षीय मुलाने कांदा चिरणाऱ्या बापाची सुरी हिसकावून बापाचाच खून केला.
या घटनेतील मृत वडील हे ज्या इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात, तिथेच पार्किंग लॉटमध्ये कुटुंबासह राहण्यास आहेत. गुरूवारी संध्याकाळी कांदा चिरण्यासाठी सुरी घेतल्यानंतर कांदा चिरत असतानाच त्यांच्याच दोन मुलांची भांडणे सुरू असल्याचे त्यांना दिसले. मुलांच्या ओरडण्याचा त्रास रहिवासी इमारतीतील कुटुंबांना होतो या भीतीने त्यांनी मुलांना गप्प करण्याचा प्रयत्न केला.
तरीदेखील मुले गप्प होत नाहीत हे पाहून त्यांनी मुलाला ओरडून गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून मुलगा चिडला. त्याने बापाची सुरी हिसकावून घेतली आणि बापाच्या पोटात भोसकली. सुरी आतड्यापर्यंत गेल्याने त्याक्षणी रक्तस्त्राव होऊन या मुलाच्या वडीलांची प्रकृती गंभीर बनली. त्यांना दवाखान्यात नेले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेप्रकरणी १३ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत आहेत.











