अमरावती : महान्यूज लाईव्ह
अमरावती शहरात काल एकापाठोपाठ पंधरा ते सोळा रुग्णवाहिका सायरन वाजवत शहरातून रेल्वेस्थानक गांधी चौक ते हिंदू स्मशानभूमीकडे निघाल्या आणि शहरातील नगर वासियांचा काळजाचा ठोका चुकला. कोरोनाच्या रुग्णसेवेत असलेल्या रुग्णवाहिका चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शहरातील रुग्णवाहिका चालक त्याच्या अंत्ययात्रेत आपापल्या रुग्णवाहिका घेऊन सहभागी झाले होते. मात्र काही काळ शहरात मोठा गोंधळ उडाला.
अमरावती शहरातील संजय पुणसे या रुग्णवाहिका चालकाचा कोरोनामुळे बुधवारी पहाटे १ वाजता मृत्यू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयापासून हिंदू स्मशानभूमी पर्यंत अनेक रुग्णवाहिका सायरन वाजवत निघाल्या होत्या. एकाच वेळी अनेक रुग्णवाहिका शहरातुन निघाल्याने देशातील इतर राज्यांमध्ये जे चित्र ऐकले जात आहे, एका एका रुग्णवाहिकेचे मध्ये २०-२०; २५-२५ मृतदेह नेले जातात, अंत्यसंस्कारासाठी देखील खूप रांगा आहेत असेच चित्र आणि अशा प्रकारची चर्चा ऐकायला मिळत असताना, ते चित्र जणू शहरात आहे अशी भावना लोकांमध्ये उमटली. आज शहरांमध्ये कोरोनामुळे एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे की काय? किंवा एवढे रुग्ण आता उपचारासाठी दाखल केले जात आहेत की काय? अशी भीती नागरिकांमध्ये उभी राहिली व फोनाफोनी झाली.
मात्र प्रत्यक्षात आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या अंतिम संस्कारासाठी सारे रुग्णवाहिका चालक एकाच वेळी स्मशानभूमीकडे एकत्र न जाता आपापल्या रुग्णवाहिका घेऊन निघाले होते. मात्र असा प्रकार खरोखरच योग्य आहे का? आणि रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना सायरन वाजवा का? असा प्रश्न मात्र यानिमित्ताने उभा राहिला आहे.
गेलेल्या रुग्णवाहिका चालकाने आजपर्यंत कोरोनाची रुग्ण सेवा केली असल्याने तसेच शहरातील कोणी फारसे या विषयावर बोलले नाही, परंतु तरीदेखील माणुसकी, संवेदनशीलता आणि समाजाची भीती याचा विचार करता यामध्ये इतरांनी तारतम्य बाळगण्याची गरज आहे असाच सवाल या निमित्ताने उभा राहिला.
दरम्यान शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल आठवले यांनी मात्र जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा सुरू असताना, एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण वाहिका चालकांनी सायरन वाजवत नागरिकांमध्ये भीती निर्माण केली. त्यामुळे या चालकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.











